" रविकांत तुपकर पोहचले पूरग्रस्तांच्या बांधावर ! जळगाव जामोद तालुक्यात केला १५ गावांचा दौरा,महसूल यंत्रणेला खडसावले; 'नुकसान कमी दाखवण्याचे आदेश कुणाचे?
आठवड्यात १०० टक्के मदत द्या, अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू... तुपकरांचा कडक इशारा.! नद्यांचे खोलीकरण युद्धपातळीवर करा, जिल्हाधिकारी व तहसीलदारांशी तुपकरांची चर्चा
भेंडवळ खु , भेंडवळ बु, चावरा, ईलोरा, मडाखेड खु, पळसखेड,येनगाव, वडशिंगी, उटी खु, उटी बु, निंभोरा बु, खेर्डा बु,सातळी,जळगाव शहर व जळगाव जामोद तालुक्यातील अनेक गावांमध्ये तुपकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. अनेक ठिकाणी शेतजमीन तब्बल चार ते पाच फूट खोलपर्यंत खरडून गेल्याचे, तर काही ठिकाणी विहिरी वाहून गेल्या, अनेक विहिरी खचल्या, शेतातील बांध फुटले आणि शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे भयावह चित्र त्यांच्या समोर आले. अनेक शेतकरी हताश अवस्थेत दिसून आले.
पूरग्रस्त भागातील पंचनाम्यांवर संताप व्यक्त करत तुपकर यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना थेट जाब विचारला. "जिथे शंभर टक्के नुकसान झाले आहे, तिथे पंचनाम्यात ३० ते ४० टक्के नुकसान दाखवले जात आहे. तुम्हाला नुकसान कमी दाखवण्याचे आदेश कुणी दिले? शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासाठीच ही यंत्रणा काम करत आहे का?" असा संतप्त सवाल त्यांनी केला. "पंचनाम्यांच्या नावाखाली वेळकाढूपणा आणि आकडेवारीचा खेळ बंद करा. शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवायला लावू नका. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसानभरपाई मिळालीच पाहिजे. सरकारने आठवडाभराच्या आत मदत जाहीर करून ती थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, नाहीतर सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा तुपकर यांनी दिला.
दरम्यान, कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार ३० आणि ३१ जुलैच्या अतिवृष्टीत बुलढाणा जिल्ह्यात तब्बल ८४ हजार ८७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ४९५ गावे बाधित झाली असून १ लाख १३ हजार ४३९ शेतकऱ्यांना या आपत्तीचा फटका बसला आहे. ही केवळ प्राथमिक आकडेवारी असून प्रत्यक्ष नुकसान यापेक्षाही अधिक असल्याचेही शेतकरी सांगत आहेत.
"शेतकऱ्यांवर आलेले हे संकट आपल्या सर्वांवर आलेले संकट आहे. पूरग्रस्तांना विशेष पॅकेज द्या, शंभर टक्के नुकसानभरपाई द्या आणि पंचनामे पारदर्शक करा. आठवडाभरात मदत न मिळाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडू. त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
यावेळी तुपकर यांनी केवळ नुकसानभरपाईची मागणी न करता भविष्यातील आपत्ती टाळण्यासाठीही महत्त्वाचा उपाय सुचवला. ते म्हणाले, "जळगाव जामोद आणि संग्रामपूर हे सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेले तालुके आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे भविष्यात पावसाचा खंड,अतिवृष्टी आणि महापुराच्या घटना आणखी वाढण्याची शक्यता आहे. पर्वतरांगांमधून ओढे आणि नद्यांद्वारे मोठ्या वेगाने पाणी खाली येते. मात्र नद्या आणि ओढे पुरेसे खोल नसल्याने पाण्याचा वेगवान प्रवाह थेट घुसतो आणि चार-पाच फूट खोलपर्यंत सुपीक जमीन खरडून नेतो." "सरकारने या भागातील प्रमुख नद्या आणि ओढ्यांचे वैज्ञानिक पद्धतीने खोलीकरण करण्यासाठी तातडीने पायलट प्रोजेक्ट सुरू करावा. हा प्रकल्प राबवला तर भविष्यातील महापुराचा फटका मोठ्या प्रमाणात कमी करता येईल आणि हजारो एकर सुपीक शेती वाचू शकेल," अशी मागणी तुपकर यांनी केली.यांसदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी तहसीलदार यांचेशी चर्चा केली.
यावेळी दौऱ्यात युवा नेते अक्षय पाटील, अनिलसिंह राजपूत, शिवदास खिरोडकार, भागवत वाघ, वैभव जाणे, अजय गिरी, आकाश आटोळे, असलम शेख, दिपक पाटील,दिलीप बोबळे ,अझहर शेख, राजेंद्र राखोडे, त्रिलोकसिंह राजपूत, संतोष गणगे, कय्यूम खान, सदाशिव जाणे, तुकाराम पाटील, प्रमोद तिजारे, अनंता मारोडे, विष्णू कुकडे, राजू पाटील शित्रे, प्रणव देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.