अतिवृष्टी झालेल्या भागात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ १००% मदत द्या : रविकांत तुपकर यांची सरकारकडे मागणी! 

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काल दिनांक २१ सप्टेंबर रोजी झालेल्या ढगफुटीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका मोताळा तालुक्यातील नळकुंड,उबाळखेड, बुलढाणा तालुक्यातील ,पाडळी,ईजलापुर,गुम्मी, गिरडा,सिंदखेडराजा तालुक्यातील सोनोशी, वरदडी, जांभोरा, रूम्हना, खैरखेड, देवखेड तसेच लोणार तालुक्यातील महारचिकना, खापरखेड घुले, सोमठाणा या परिसराला फटका बसला आहे.
अतिवृष्टीमुळे शेतजमिनीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. सोयाबीन, कापूस, तुर या मुख्य हंगामी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके सडण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने आधीच कर्जबाजारीपणामुळे त्रस्त असलेला शेतकरी आणखी मोठ्या संकटात सापडला आहे.
या गंभीर परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले की,"या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे जगणेच कठीण झाले आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १००% मदत द्यावी. या भागाला ‘ओला दुष्काळ’ घोषित करून तात्काळ नुकसान भरपाई देणे ही काळाची गरज आहे."
तुपकर यांनी पुढे स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या या संकटाकडे दुर्लक्ष केल्यास जनआंदोलन उभारण्याची वेळ येईल. राज्य सरकारने तातडीने कार्यवाही करून शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्यास तयार रहावे.