शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी रविकांत तुपकर आक्रमक; १०० टक्के पिक विमा, कर्जमाफीची मागणी; मलकापुरात काढला भव्य माेर्चा; साेयाबीन, कापूस लढाई उभी करणार..!

 
 मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :शेतकऱ्यांना १०० टक्के पीक विमा तसेच कर्ज माफी मिळावी यासह विविध मागण्यांसी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शनिवारी मलकापूर येथील उपविभागीय कार्यालयात माेर्चा काढण्यात आला. या माेर्चानंतर विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. 
 थकलेला पिक विमा १०० टक्के मिळावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी, विवरा गावातील सोलर कंपनीने अतिक्रमण केलेला रस्ता मोकळा व्हावा, ज्वारीची खरेदी सुरू व्हावी, तसेच कापूस आणि सोयाबीनच्या आयात-निर्यात धोरणात बदल व्हावा, शेतमजूरांना विमा सुरक्षा मिळावी, जंगली जनावरांचा त्रास अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाला संबोधित करताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, शेतकऱ्यांची ही लढाई दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आहे. सरकारने कापसावरील आयात शुल्क हटवल्याने कापसाचे भाव कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारने तातडीने आयात-निर्यात धोरणात बदल करावा. तसेच, सोयाबीनची सोयापेंड निर्यात करावी, जेणेकरून शेतकऱ्यांना सोयाबीनला रास्त भाव मिळन्यास मदत होईल.
 तुपकर पुढे म्हणाले की, आज मलकापूरात सुरू झालेला हा मोर्चा एका वणव्यासारखा संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल. निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे. पिक विमा कंपन्यांनी अधिक विलंब न करता शेतकऱ्यांना थकित पिक विमा त्वरित द्यावा. सध्या आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत, परंतु सरकारने दिरंगाई केली तर आम्हाला आक्रमक आंदोलनही करता येईल, असा इशारा त्यांनी दिला. या मोर्चात मलकापूर तालुक्यासह आसपासच्या परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी जनता चौक ते तहसील कार्यालय असा हा माेर्चा काढण्यात आला.