रेशन कार्डधारकांनो सावधान! घरात चारचाकी, चार एकरांपेक्षा जास्त शेती आहे? ‘या’ १० निकषांवर होणार छाननी; अपात्र ठरल्यास रेशनचे धान्य होणार बंद!
या अभियानांतर्गत शासनाच्या दहा निकषांच्या आधारे रेशन कार्डधारकांची पात्रता तपासली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असणे, कुटुंबातील सदस्याच्या नावावर चारचाकी अथवा मोठे वाहन असणे, चार एकरांपेक्षा अधिक शेतजमीन असणे, कुटुंबातील सदस्य शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असणे, आयकर भरणारे कुटुंब, मोठे पक्के घर अथवा व्यावसायिक मालमत्ता असणे, तीन किंवा पाच किलोवॅट क्षमतेचा जनरेटर अथवा एसी असणे, नोंदणीकृत व्यवसाय असणे या बाबींची छाननी केली जाणार आहे. याशिवाय सलग सहा महिने रेशन दुकानातून धान्य न उचलणे, रेशन कार्डची ई-केवायसी अपूर्ण असणे किंवा आधारची माहिती जुळत नसणे, याचीही तपासणी करण्यात येणार आहे. संबंधित निकषांच्या आधारे पात्रतेबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, रेशन कार्डवर मृत व्यक्तींची नावे, विवाहानंतर अन्य कुटुंबाच्या रेशन कार्डमध्ये समाविष्ट झालेल्या मुलींची नावे अथवा दुबार नोंदी असल्यास त्या दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे. आधार कार्ड आणि रेशन कार्डवरील नाव किंवा पत्त्यामध्ये तफावत असल्यास तीदेखील दूर करावी. पात्र असूनही रेशन कार्डमधून नाव चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आले असेल किंवा धान्य मिळण्यात अडचण येत असेल, तर संबंधितांनी तहसील कार्यालय, पुरवठा विभाग अथवा सेतू सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. पात्र लाभार्थ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी आपल्या रेशन कार्डची माहिती, आधार जोडणी आणि ई-केवायसीची स्थिती तपासून आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन लोणारचे तहसीलदार भूषण पाटील आणि पुरवठा निरीक्षण अधिकारी आरती दांडगे यांनी केले आहे.