पाडळी परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाचा कहर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :तालुक्यातील पाडळी परिसरात आज सकाळी ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले. मागील काही दिवसांपासून सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार व चिखली तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचे प्रचंड नुकसान झाले होते. आता बुलडाणा तालुका देखील या यादीत सामील झाला आहे.
आज सकाळी पाडळी, गिरडा, चौथा, अटकळ, गुम्मी व इजलापुर या गावांमध्ये दीड तासांपेक्षा जास्त काळ मुसळधार पाऊस कोसळला. यामध्ये सुमारे ५५.३ मिमी पावसाची नोंद झाली. पावसामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली असून, पाडळी शिवारातील तलाव तुडुंब भरल्याने तलाव व नदीचे पाणी शेतांमध्ये शिरले. शेतकऱ्यांची शेती अक्षरशः तलावाचे रूप धारण करताना दिसली.
कापणीस आलेला उडीद, सोयाबीन तसेच उभे असलेले मका पिक मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेले असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
दरम्यान, पाडळी विभागाच्या तलाठी यू. आर. इंगळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून कुठलेही निकष न लावता मदत देण्याची मागणी केली आहे.