तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ राज्यात ठिक-ठिकाणी आंदोलने! बुलढाण्यातही ॲड. शर्वरी तुपकरांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने;

सिंदखेडराजात अर्धनग्न रॅली! टॉवरवरही चढले शेतकरी....

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ गावागावातील शेतकरी आता बाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. बुलढाणा येथे शेतकऱ्यांनी आज ५ सप्टेंबर रोजी एकत्रित येवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. त्यानंतर तुपकारांच्या पत्नी ॲड. शर्वरीताई तुपकरांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तर सिंदखेडराजा येथे शेतकऱ्यांना अर्धनग्न रॅली व कापसाची झाडे हातात घेवून रॅली काढत जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सिंदखेडराजा येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाचे समर्थन करण्यासह आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी गावागावातील शेतकरी आता बाहेर पडत आहेत. बुलढाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्रित येवून आज ॲड.शर्वरी तुपकरांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यासमोर जोरदार निदर्शने केली. सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाची दखल घ्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. या आंदोलनानंतर ॲड. शर्वरीताई तुपकर यांच्यासह शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तर बुलढणा जिल्ह्यातील देऊळगावराजा, मोताळा,खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जमोद येथील तहसीलदारांनाही शेतकऱ्यांना निवेदने दिली आहेत. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका,अन्यथा राज्यभर आंदोलन पेटेल असा, इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे. 
 सिंदखेडराजात निघाली अर्धनग्न रॅली...
तुपकरांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस असून या आंदोलनाला जोरदार समर्थन मिळत आहे. गावागावातील शेतकरी आंदोलनाच्या बाजूने उभा राहत असल्याने आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी निदर्शने करीत आहे. तर सिंदखेडराजात शेतकऱ्यांनी अर्धनग्न होवून हातात कपाशीची झाडे घेवून निषेध रॅली काढली. यावेळी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाबाबत जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. आता टप्प्याटप्प्याने हे आंदोलनाचा अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.
तुपकरांच्या समर्थनार्थ राज्यात ठिक-ठिकाणी निवेदने-आंदोलने
 
रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला राज्यात ठिक-ठिकाणी पाठिंबा मिळत असून, बुलढाण्या प्रमाणेच वाशिम, वर्धा, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली, जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, लातूर या जिल्हयामध्ये शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदने देवून रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तर हिंगोली वाशिम मध्ये शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून आंदोलन केले तर अनेक ठिकाणी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला. तर उद्या गावागावात शेतकरी प्रभातफेरी काढून या आंदोलनात सहभागी होणार आहेत.