आंदोलन अपडेट: मंत्रालय परिसरातील झाडांनाही पोलिस सुरक्षा! ‘क्रांतिकारी’च्या शिलेदारांची धरपकड;

मरीन ड्राईव्हवर अनेकांना ताब्यात, आमदार निवास परिसरातून जिल्हाध्यक्ष डॉ. टाले यांनाही अटक; तुपकरांचा ठावठिकाणा अद्याप नाहीच!

 
मुंबई (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांच्या आजच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून, कालपासून सुरू असलेली कार्यकर्त्यांची धरपकड आजही सुरूच आहे. मंत्रालय परिसर, मंत्र्यांचे शासकीय बंगले, आमदार निवास आणि मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मरीन ड्राईव्हवर सकाळपासून अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आमदार निवास परिसरातून क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. टाले यांनाही काही वेळापूर्वी अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

 

 

मंत्रालयातील झाडांनाही पोलिसांची ‘सुरक्षा’!

या आंदोलनाची सर्वाधिक चर्चा होण्याचे कारण ठरले आहे ते म्हणजे मंत्रालय परिसरातील झाडांनाही देण्यात आलेली पोलिस सुरक्षा! मागील आंदोलनावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या काही शिलेदारांनी मंत्रालय परिसरातील उंच झाडांवर चढून आंदोलन केले होते. आंदोलकांना झाडांवरून खाली उतरवताना मुंबई पोलिसांसह प्रशासनाची अक्षरशः दमछाक झाली होती. त्या हटके आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली होती.यावेळी तशीच परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने विशेष खबरदारी घेतल्याचे दिसत आहे. मंत्रालय परिसरातील झाडांभोवतीही पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला असून, आता आंदोलकांपासून मंत्र्यांचे बंगलेच नव्हे, तर झाडांचेही संरक्षण करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे!

मरीन ड्राईव्हवर सकाळपासून धरपकड

तुपकरांच्या आंदोलनासाठी मुंबईत दाखल झालेल्या संभाव्य आंदोलकांच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर आहे. मरीन ड्राईव्ह परिसरात आज सकाळपासून पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. संशयित हालचालींवर लक्ष ठेवत पोलिसांकडून नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची विचारपूस सुरू आहे.

आंदोलकांना आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचण्याआधीच रोखण्यासाठी पोलिसांकडून ही कारवाई केली जात असल्याचे सांगितले जात आहे.

आमदार निवास परिसरातून डॉ. टाले यांना अटक!

दरम्यान, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. टाले यांनाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. आमदार निवास परिसरातून काही वेळापूर्वी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे.एकीकडे मरीन ड्राईव्हवर कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असताना दुसरीकडे आमदार निवास परिसरातून क्रांतिकारीच्या जिल्हाध्यक्षांनाच अटक झाल्याने आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन किती सतर्क आहे, हे स्पष्ट होत आहे.

तुपकर मात्र अजूनही ‘आऊट ऑफ रडार’!

विशेष म्हणजे, पोलिसांनी क्रांतिकारीच्या शिलेदारांची धरपकड सुरू केली असली, मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला असला आणि मंत्रालय परिसरातील झाडांनाही सुरक्षा दिली असली तरी रविकांत तुपकर नेमके कुठे आहेत, याचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही.तुपकर आज सकाळी १० वाजता मंत्रालय परिसरात आंदोलन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांचा एवढा कडेकोट बंदोबस्त असताना तुपकर अचानक आंदोलनस्थळी प्रगटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘क्रांतिकारी’च्या आंदोलनाचा आज कसोटीचा दिवस!

एका बाजूला तुपकरांचा ठावठिकाणा नाही, दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. मरीन ड्राईव्हवर अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे, आमदार निवासातून जिल्हाध्यक्ष डॉ. टाले यांना अटक झाली आहे आणि मंत्रालय परिसरातील झाडांनाही पोलिस सुरक्षा देण्यात आली आहे.
म्हणजेच मुंबई पोलिसांनी आंदोलन रोखण्यासाठी जमीनपासून झाडांपर्यंत बंदोबस्त उभा केला आहे; पण ‘क्रांतिकारी’चे नेते रविकांत तुपकर या सगळ्या सुरक्षा व्यवस्थेला चकवा देऊन कुठे आणि कसे प्रगट होतात, याचीच आता उत्सुकता आहे. आजच्या आंदोलनात पुढच्या काही तासांत काय घडते, याकडे बुलढाण्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.