परिक्षा सुरू असताना मोबाईल पकडला म्हणून प्राध्यापकाला विद्यार्थ्याने मारले! बुलडाण्यातील धक्कादायक घटना!
Updated: Dec 13, 2023, 12:25 IST
(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहराच्या सीमेलगत असलेल्या रोडवरील विद्या सच्चीतांनद फुलेकर महाविद्यालयात ११ डिसेंबरला एका विद्यार्थ्याने राडा केला. प्राध्यापकाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी प्राध्यापक सचिन गवई यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्याच महाविद्यालयात शिकणारा धीरज मोरे व त्याचा सहकारी मित्र अशा दोघांवर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र परीक्षा मधील गैरप्रकार प्रतिबंधक कायद्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झाले असे की, विद्या सचितानंद फुलेकर महाविद्यालयात परीक्षा सुरू आहे. सोमवारी परीक्षा सुरू असताना सकाळी १० वाजेच्या सुमारास प्राध्यापक सचिन गवळी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच्या सूचना दिल्या. मात्र बारा वाजता विद्यार्थ्यांची चेकिंग करताना, एका विद्यार्थ्यांची संशयास्पद हालचाल दिसली. यावरून प्राध्यापकांनी झडती घेतली असता विद्यार्थ्याजवळ मोबाईल आढळला. त्याबद्दल प्राध्यापक सचिन विचारत असतानाच विद्यार्थ्यांनी शिवीगाळ केली व महाविद्यालयातून निघून गेला. त्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास त्याच महाविद्यालयात शिकणारा धीरज मोरे त्याच्या मित्रासोबत गेट वरून उडी मारून प्राचार्य कक्षाकडे आला.
त्यानंतर प्राध्यापक गवई यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळही केली, इतकच नाही तर ऑफिस मधील साहित्य, अस्थाव्यस्थ केले, व अर्थशास्त्र कौटिल्य विषयाचे पेपर फाडून टाकले आणि दोन पेपर सोबत घेऊन गेला. प्राध्यापक गवई यांनी दिलेल्या तक्रारी नुसार धीरज मोरे व त्याच्या मित्रावर भारतीय दंड संहितेनुसार कलम 332, 34, 353, 427, 452 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश लोधी करीत आहेत