प्रा. संजय गायकवाड आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित! बुलडाणा तालुक्यातील कोलवडचे आहेत प्रा.गायकवाड

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ या समाजाभिमुख संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रा. संजय गायकवाड यांना छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिक्षण समितीच्यावतीने रविवारी आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 

बुलढाणा तालुक्यातील कोलवड हे प्रा.संजय गायकवाड यांचे मूळ गाव आहे. त्यांचे वडील दिवंगत शिवाजी गायकवाड हे मुख्याध्यापक होते. आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रा. संजय गायकवाड यांनी शिक्षण, समाजकारणात स्वतःला झोकून दिले आहे. सध्या ते सरस्वती भुवन महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहेत. सेवा, शिस्त, समर्पण हे त्यांचे विशेष गुण आहेत. इंग्रजी सारखा अवघड विषय सहज, सुलभ व सरल पद्धतीने समजावून सांगण्याची त्यांची अनोखी व विलोभनीय हातोटी आहे. 

विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या संघटनेद्वारे सोडवण्यासाठी ते निरंतर अग्रभागी असतात. लोकप्रिय, कार्यतत्पर आणि कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणूनही ते संपूर्ण महाराष्ट्रभर सुपरिचित आहेत. कोरोनाकाळातही त्यांनी जनसामान्यांना आर्थिक, कौटुंबिक व सामाजिक आधार देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. शिक्षण क्षेत्रातील निष्ठा असलेल्या व्यक्तिमत्वास हा गौरव प्राप्त झाल्याने सर्वस्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

प्रा. गायकवाड हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्यपाल नियुक्त अधीसभा सदस्य, महाराष्ट्रातील अग्रगण्य देवगिरी बँकेचे उपाध्यक्ष, लहुजी साळवे कर्मचारी महासंघाचे राज्य अध्यक्ष आहेत. विविध सामाजिक संघटनाचे सल्लागार, मार्गदर्शक म्हणूनही ते कार्यरत असतात.