एचएससी बोर्डाचा ढिसाळ कारभार; पुनर्मुल्यांकणात वाढले तब्बल २३ गुण! ओम सिरसाट चिखली तालुक्यात प्रथम
महाराष्ट्र राज्य माध्यमिक - उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने फेब्रुवारी- मार्च 2026 मध्ये इयत्ता बारावीची परीक्षा घेतली. मूळचा रायपूरचा आणि सध्या एकलारा येथे स्थायिक ओम अनिल सिरसाट चिखलीच्या आदर्श विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. नेहमीच शाळेत टॉपर असलेला ओम सर्वच शिक्षकांचा लाडका विद्यार्थी आहे. बारावीत तो प्रथम येईल याची सर्वांना खात्री होती. मात्र, परीक्षेचा निकाल जाहीर होताच सर्वच अवाक झाले. ओमला ८७. ३३ टक्के गुण मिळाले. त्यामुळे पालकांनी पुनर्मुल्यांकणाचा अर्ज भरला. हा निकाल जाहीर झाल्यानंतर ओमचे तब्बल २३ गुण वाढून तो तालुक्यात प्रथम आला.
दहावी परीक्षेत सुध्दा ओम प्रथम आला होता. तसेच आतापर्यंत स्कॉलरशिप, एनएमएमएस ओलंपियाड अशा कितीतरी परीक्षेत त्याने गोल्ड मेडल मिळवून पात्रता सिद्ध केलेल्या आहेत. जेईई
अँडव्हान्स २०२६ मध्ये त्याने देशात ओबीसी प्रवर्गातून २२३ वा क्रमांक मिळून घवघवीत यश प्राप्त केले आहे. त्याने मिळवलेले यश हे अतिशय संकटातून मिळविले आहे. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना त्याची प्रेरणा मिळेल. त्याने आपल्या यशाचे श्रेय गुरुजनांना आणि आई - वडीलांना दिले आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर हे नॉनग्रँड शाळेच्या शिक्षकांनी तपासल्यामुळे चांगल्या विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये किती फरक पडतो याचे हे जिवंत उदाहरण आहे. बोर्डाने निकाल लवकर लावण्याची घाई केल्यामुळे अशा कितीतरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असेल याचा अंदाज नाही. बोर्डाने यानंतर नॉनग्रँड शाळेवरील शिक्षकांकडून पेपर तपासणी करताना अगोदर त्यांचा दर्जा तपासून पहावा . ज्यामुळे मुलांचे नुकसान होणार नाही. तसेच बोर्डाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही. कारण पेपर फोटोकॉपी मागणी आणि त्यानंतर पुनर्मुल्यांकणासाठी परत पालकांना जर पाच विषय असतील तर कमीत कमी साडेतीन हजार रुपये खर्च येतो. ही चूक बोर्डाची आणि व्हॅलीवरची असताना हा भुर्दंड पालकांना भरावा लागतो. यावर बोर्ड विचार करेल.अन्यथा विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता निर्माण होऊन आक्रोश तयार होऊ शकतो..पेपर हे चांगल्या तज्ञ शिक्षकांकडून तपासले गेले पाहिजे. त्यामुळे बोर्डाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही. तसेच विद्यार्थ्यांनाही मानसिक त्रास होणार नाही, अशी आग्रहाची मागणी पालक अनिल सिरसाट यांनी केली आहे.