Politics ‘अमिषाला बळी पडायचं नाही, शिक्षकांसाठी काम करणाऱ्यालाच मतदान!’; प्रा. सुरेश देवकर यांचा एल्गार!
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या रणधुमाळीत शिक्षक भारतीचे सुरेश देवकर मैदानात; ५ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार....
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची २०२६ची निवडणूक प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली असून, निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे.
‘शिक्षकांच्या प्रश्नांवर बोलणारा प्रतिनिधी हवा’
पत्रकारांच्या विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देताना प्रा. सुरेश देवकर यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली. शिक्षक भारतीची स्थापना कपिल पाटील यांनी २००६ मध्ये केली असून, संघटनेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात झाला आहे, असे त्यांनी सांगितले. अमरावती विभागात शिक्षक भारतीचे साडेपाच हजारांहून अधिक सदस्य असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. या निवडणुकीत जुनी पेन्शन योजना हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याचे प्रा. देवकर यांनी स्पष्ट केले. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत आलेले, मात्र त्यानंतर अनुदान प्राप्त झालेले सुमारे २६ हजार शिक्षक जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
‘६०-८० टक्के अनुदानावर सेवानिवृत्त झालेल्यांचं काय?’
अनेक शिक्षक ६० किंवा ८० टक्के अनुदानाच्या टप्प्यावर असतानाच सेवानिवृत्त झाले असून त्यांनाही पेन्शनचा लाभ मिळत नसल्याचे प्रा. देवकर म्हणाले. ‘आयुष्यभर विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांना उतारवयात जगण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर ही गंभीर बाब आहे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त विविध अशैक्षणिक शासकीय कामे सोपविली जात असल्याने त्यांच्या मूळ अध्यापनाच्या कामावर परिणाम होत असल्याचेही त्यांनी सांगितले. बीएलओ, एसआयआर यासह विविध अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची मुक्तता करून त्यांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
‘शिक्षक यंदा अमिषाला बळी पडणार नाहीत!’
निवडणुकीच्या राजकीय वातावरणावर भाष्य करताना प्रा. देवकर यांनी शिक्षक मतदारांच्या भूमिकेबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. “शिक्षकांनी यंदा ठरवलं आहे की कुठल्याही अमिषाला बळी पडायचं नाही. शिक्षकांसाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्यालाच शिक्षक मतदान करतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिक्षक भारती संघटनेने वेळोवेळी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला असून, याच कामाच्या आधारावर आपण शिक्षकांसमोर जात असल्याचेही देवकर यांनी स्पष्ट केले.
देवकरांचा ‘निर्धार’ काय?
प्रा. सुरेश देवकर यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आपला अजेंडा स्पष्ट केला. त्यामध्ये—१ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी लढा उभारणे. बीएलओ, एसआयआर व इतर अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची मुक्तता करून अध्यापनाला प्राधान्य देणे.
सर्व शिक्षकांना वेळेवर वेतन मिळण्यासाठी पाठपुरावा करणे.
राज्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी प्रयत्न करणे.शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी संघर्ष करणे. कला, क्रीडा, संगीत, कार्यानुभव व संगणक शिक्षकांची हंगामी नियुक्ती न करता कायमस्वरूपी नियुक्ती करण्यासाठी आवाज उठवणे.अशा विविध मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाणार असल्याचा निर्धार प्रा. देवकर यांनी व्यक्त केला.
शिक्षकांच्या प्रश्नांवरून निवडणुकीत रंगणार संघर्ष
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात यंदा विविध राजकीय व शिक्षक संघटनांची गणिते महत्त्वाची ठरण्याची चिन्हे आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांसोबतच जुनी पेन्शन, शिक्षकांची रिक्त पदे, अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा आणि शिक्षक भरती यांसारखे मुद्दे निवडणुकीच्या केंद्रस्थानी येत आहेत. अलीकडील राजकीय घडामोडींमुळेही या मतदारसंघातील निवडणूक चर्चेत आली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष प्रा. सुरेश देवकर यांनी ५ ऑक्टोबरला अर्ज दाखल करण्याची घोषणा करत आपली निवडणूक लढाई अधिकृतपणे पुढे नेली आहे. आता शिक्षक मतदार त्यांच्या प्रश्नांवर कोणता अजेंडा आणि कोणती भूमिका स्वीकारतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.