Politics अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आज ४ उमेदवारांचे अर्ज दाखल; आतापर्यंत ६ उमेदवार रिंगणात...

 
 अमरावती(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी ४ उमेदवारांनी ४ नामनिर्देशनपत्रे दाखल केली. त्यामुळे आतापर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या ६ झाली आहे.

आज अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये अशोक वामन हिवाळे (अपक्ष), दिलीप भिमराव कडू (अपक्ष), गाजी मोहम्मद जाहेरोश (वंचित बहुजन आघाडी) आणि आशिष मनोहर अंबुलकर (अपक्ष) यांचा समावेश आहे.दरम्यान, आज ७ व्यक्तींनी १५ नामनिर्देशनपत्रांची उचल केली आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रविवारी अर्ज दाखल करता येणार नाही

रविवार, ४ ऑक्टोबर रोजी शासकीय सुट्टी असल्याने या दिवशी नामनिर्देशनपत्रांची उचल किंवा अर्ज दाखल करता येणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आता मर्यादित कालावधी शिल्लक राहिला आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार, ६ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.शुक्रवार, ९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणातील अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

२३ ऑक्टोबरला मतदान; २७ ऑक्टोबरला मतमोजणी

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ आल्याने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणूक वातावरण आता अधिक रंगण्याची चिन्हे आहेत.