पोलीस आणि आरटीओ जोमात, डीजेवाले कोमात!  २२ डीजेवाहनांवर कारवाई, एकूण ६ लाख ३२ हजारांचा दंड!

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) खबरदार! तुम्ही सुद्धा डीजेचे बुकिंग केले असेल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे.. मागील काही दिवसांपासून झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर  डिजेवाल्यांसाठी जिल्हा पोलिस विभाग ॲक्शन मोडवर आले आहेत. विनापरवाना डीजे वाजवणे,  आवाजाची मर्यादा ओलांडणे तसेच डीजेसाठी वाहनात बदल करणे या कारणांवरून डीजे धारकांवर कारवाई करण्यात येत आहेत. आरटीओ तसेच पोलीस विभागाद्वारे ही कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान,  डीजेसाठी वाहनात बदल केल्याने तसेच कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे आतापर्यंत  २२ डीजे धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये एकूण ६ लाख ३२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

 मलकापूर  शहर पोलीस स्टेशन हद्दीतील चार डिजेंवर झालेल्या कारवाईत २८५००, ४०५००, ३८५००, २८५०० असा एक लाख ३६ हजारांचा दंड आकारण्यात आला तर सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत दोन डीजे धारकांवर झालेल्या कारवाईत ५५ हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये ३३५००, मेहकर पोलीस स्टेशन हद्दीत ३३,५०० आणि ४३०००, हीवरखेड भागात ४७५०० व बोरखेडी हद्दीत झालेल्या दोन डिजेंवरील कारवाईत ७४ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. इतकेच नाही तर आज  अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत  डीजेसाठी वाहनात बदल केल्यामुळे २ डीजे धारकांवर कारवाई झाली आहे. त्यामध्ये एकूण ७९,५०० रुपयांचा दंड तसेच सिंदखेडराजा येथे एका डीजे वाहनावर ८० हजार दोनशे रुपयांचा दंड उपप्रादेशिक विभागाने वसूल केला आहे. अशाप्रकारे एकूण २२ कारवायांमधून ६ लाख ३२ हजार पर्यंत दंड आकारण्यात आल्याची माहिती एस.पी. कडासणे  यांनी दिली आहे. 

 मागील काही दिवसाअगोदर डीजेच्या वाढत्या आवाजामुळे झालेली हानी तसेच आक्षेप असलेली  गाणी वाजवल्यामुळे परिणामी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील टूणकी गावात याच कारणावरून तणाव निर्माण झालेला होता. अशी सगळी पार्श्वभूमी असल्याने जिल्हा पोलीस तसेच आरटीओ प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. 


परवानगी मिळाल्यानंतर , ह्या  विशेष सूचना..! 

डीजे धारकांनी परवानगी मिळवल्यानंतर देखील आवाजाची मर्यादा पाळणे अत्यंत गरजेचे आहे. किमान ४० तर जास्तीत जास्त ७५ डिसिमल पर्यंत डीजेचा आवाज असणे बंधनकारक आहे. त्यावर आवाज चढविला, तर कारवाई करण्यात येईल. लग्न मंगल कार्यालयात देखील यासंबंधिच्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मंगल कार्यालयाच्या आवारातच वाद्य वाजविण्याची परवानगी असल्याची माहिती शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी दिली आहे.