चिखलीत खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्र सुरू

 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देशात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार व्हावेत, यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक जिल्ह्यात खेलो इंडिया सेंटर सुरू करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत तलवारबाजी या खेळाचे सेंटर मंजूर झाले असून, त्याचा शुभारंभ नुकताच चिखलीतील तालुका क्रीडा संकुलात झाला.

तलवारबाजी क्रीडा प्रशिक्षण केंद्राची निवड चाचणी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव मार्गदर्शनाखाली बुलडाण्यातील जिल्हा क्रीडा संकुलात झाली. यावेळी बुलडाणा जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव शेषनारायण लोढे (शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी), अक्षय गोलांडे (प्रशिक्षक), शुभम सुरडकर, मोहम्मद सुफीयान, कार्यालयाचे महेश खर्डेकर, अनिल इंगळे उपस्थित होते. चाचणी यशस्वीतेसाठी क्रीडा अधिकारी रवींद्र धारपवार, श्रीमती मनिषा ढोके, कैलास डुडवा, कृष्णा नरोटे, गणेश डोंगरदिवे यांनी सहकार्य केले. निवड चाचणीसाठी जिल्ह्यातील खेळाडू विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चाचण्यांमधून पात्र १५ मुले व १५ मुली अशा एकूण ३० खेळाडूंची निवड करण्यात आली. त्यांना प्रशिक्षक अक्षय गोलांडे यांचे रोज सकाळ व सायंकाळ या सत्रात प्रशिक्षण मिळणार आहे. यामधूनच भविष्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होऊन पुढील काळात होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी खेळाडू निर्माण होण्यास मदत होणार आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.