पेन्शनधारकांनो सावधान! तुमच्यासोबतही होवू शकतो 'असा' स्कॅम! बातमी वाचून आत्ताच व्हा सावध..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील काही कोषागारांमधून निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या वेतनधारकांना अज्ञात व्यक्तींकडून फोनद्वारे फसवणूक होत असल्याची घटना काही ठिकाणी उघडकीस आली आहे. ती अज्ञात व्यक्ती निवृत्तीवेतनाची फरक रक्कम मिळणार असल्याचे सांगून तुमची वसूली निघत आहे, ती रक्कम तात्काळ ऑनलाईन भरावी, जेणेकरून तुमची फरक रक्कम तुम्हाला मिळेल असे सांगत आहे. काही निवृत्तीवेतनधारकांनी संबंधित व्यक्तीसोबत व्यवहार केले असून ते या फसवणूकीस बळी पडले आहेत. अशा घटना इतर जिल्ह्यांमध्ये घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोषागारामार्फत खबरदारीसाठी पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
अश्या घटना घडू नये म्हणून राज्यात सावधानतेचा ईशारा राज्याच्या निवृत्तीवेतन संचालनालाय येथील उपसंचालक संगीता जोशी यांनी सर्व जिल्हा कोषागार कार्यालयास देत जनजागृती करण्याचे सूचित केले आहे. आता तसे आवाहन करण्यात येत आहे. जिल्हा कोषागाराच्या अधीनस्थ सर्व निवृत्तीवेतन धारकांना आवाहन करण्यात आले आहे की कोषागारमार्फत निवृत्तीवेतन किंवा सुधारित निवृत्तीवेतन तसेच इतर लाभ प्रदान करण्यात येतात. 
लाभ देतांना कोणत्याही प्रकारे वसुली बाबत किंवा देण्यात येणाऱ्या रकमेबाबत फोन करुन कार्यालय संपर्क साधत नाही. ऑनलाईन व्यवहार पण होत नाही. कोषागार कार्यालय फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केल्या जात असतो. आता काहींना फोन करुन ऑनलाईन रक्कम भरण्यास सांगितल्या जात असल्याचे प्रकार घडत असून तश्या तक्रारी प्राप्त होत आहे. मात्र कार्यालयातून असा फोन केल्या जात नाही किंवा कार्यालयातील कर्मचाऱ्यांस घरी पाठविल्या जात नाही. म्हणून कोणीही अश्या फोनला प्रतिसाद देवू नये. 
फोन आल्यास सूचित करावे. शंका आल्यास कोषागार कार्यालयाशी प्रथम संपर्क करावा. तरीही निवृत्तीवेतनधारकांनी पैसे भरल्यास ती व्यक्तिगत जबाबदारी राहील, याची नोंद घ्यावी. कोणताही व्यवहार करण्यापुर्वी अथवा शंका आल्यास प्रथम कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा. ऑनलाईन, गूगल पे, फोन पे किंवा अन्य कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातून रक्कम भरण्यास सुचविल्या जात नाही. शिवाय, कोषागार कार्यालयातून याबाबत फोनद्वारे कळविल्या जात नाही. पत्र व्यवहारातून ही माहिती दिली जात आहे. असे जिल्हा कोषागार अधिकारी ऋषिकेश वाघमारे यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना स्पष्ट केले.