पालकांनो सावधान! अल्पवयीन मुलांच्या हातात स्टेअरिंग दिल्यास थेट गुन्हा; दंडासह तुरुंगवासाचीही कारवाई
जिल्ह्यात शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून परवान्याशिवाय दुचाकी चालविण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. अनेक पालक स्वतःच मुलांच्या हातात वाहनाच्या चाव्या देत असल्याचेही निदर्शनास आले आहे. अशा निष्काळजीपणामुळे गंभीर अपघात घडण्याची शक्यता वाढत असल्याने वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन व्यक्ती वाहन चालविताना आढळल्यास संबंधित पालक किंवा वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल होतो. अशा प्रकरणात तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास, २५ हजार रुपयांपर्यंत दंड तसेच संबंधित वाहनाची नोंदणी एक वर्षासाठी निलंबित करण्याची तरतूद आहे. याशिवाय अल्पवयीन मुलाला वयाची अट पूर्ण झाल्यानंतरही ठरावीक कालावधीपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मिळण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
वाहतूक विभागाने पालकांना स्पष्ट इशारा देत, "मुलांचा हट्ट म्हणून वाहन देऊ नका. एका चुकीच्या निर्णयामुळे मुलांचे भविष्य आणि कुटुंब दोन्ही अडचणीत येऊ शकते," असे आवाहन केले आहे.
जिल्हाभरात अल्पवयीन वाहनचालकांविरुद्ध विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखविली जाणार नसल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पालकांनी जबाबदारीने वागून मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.