पंडितरावांच्या विजयाने आ. श्वेताताईंच्या नेतृत्वावर चिखलीकरांनी पुन्हा उमटवली मोहर! बोंद्रेंना ओव्हर कॉन्फिडन्स नडला....!
आ.श्वेताताई म्हणाल्या, चिखलीचा विकास थांबणार नाही,चौफेर उधळणार विकासाचा रथ....
Dec 21, 2025, 17:27 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आमदार म्हणून चिखली विधानसभा मतदारसंघाचा केलेला सर्वांगीण विकास, सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी नेतृत्व म्हणून मिळवलेली ओळख, अडल्या– नडलेल्यांच्या मदतीला तत्परतेने धावून जाण्याची प्रवृत्ती या सगळ्यांचा परिणाम आज चिखली नगरपालिकेच्या निवडणूक निकालाच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आला. आ. श्वेताताईंच्या नेतृत्वात भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडितराव देशमुख यांनी विजयाचा गुलाल उधळला, १३ नगरसेवक देखील भाजपने निवडून आणले. एकप्रकारे आ. श्वेताताईंच्या विकासाभिमुख नेतृत्वार सामान्य चिखलीकरांनी पुन्हा एकदा मोहर उमटवली. या निवडणुकीत काँग्रेसने बोंद्रे कुटुंबातील काशिनाथआप्पा बोंद्रे यांना उमेदवारी दिली होती, काही गठ्ठा मतदानाच्या भरवशावर काँग्रेस सुरुवातीपासून हवेत उडतांना दिसली..अखेर मतमोजणी नंतर मात्र ती दणक्यात खाली आदळली. काँग्रेसचे १२ नगरसेवक निवडून आले.भाजपचे १३, शिवसेना व अजित पवार गटाला प्रत्येकी १ जागा मिळाली.
दरम्यान विजयानंतर चिखली शहरातून भाजपची जंगी मिरवणूक निघाली.स्वतः आमदार श्वेताताई या मिरवणुकीत उपस्थित राहिल्या. चिखलीकरांनी जातीपातीच्या राजकारणावर विश्वास न ठेवता विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला.विरोधकांनी वेगवेगळ्या अफवा पसरवल्या मात्र चिखलीकर जनतेने विरोधकांना धडा शिकवला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे, चिखलीचा विकास थांबणार नाही, विकासाचा रथ आता चौफेर उधळणार असे म्हणत आ. श्वेताताईंनी चिखलीकर जनतेचे आभार मानले..