बुलढाणा नगरपालिकेतील शंभरावर सफाई कर्मचारी पोलीस ठाण्यात धडकले; नगरसेवकावर मारहाणीचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

 
 बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा शहरात सोमवारी दुपारी तणावाचे वातावरण निर्माण झाले. नगरपालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्याला अपक्ष नगरसेवकाने मारहाण केल्याचा आरोप झाल्यानंतर संतप्त झालेल्या शंभरावर सफाई कर्मचारी, चालक आणि महिला कर्मचारी थेट बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. संबंधित नगरसेवकाविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा नगरपालिकेच्या कचरा वाहतूक ट्रॅक्टरवर चालक म्हणून कार्यरत असलेले गजानन हिवाळे यांना अण्णाभाऊ साठे नगर परिसरात अपक्ष नगरसेवक विनोद बेंडवाल यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची माहिती शहरातील इतर सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचताच संतप्त कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शहर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली.

पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने जमलेल्या कर्मचाऱ्यांनी संबंधित नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याशिवाय येथून हलणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे पोलीस ठाणे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून दोन्ही बाजूंची माहिती घेतली जात असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.