'बुलडाणा अर्बन' वरून 'राजकीय भ्रष्टाचारा'वर!

सोमय्यांची कोलांटउडी, बुलडाण्यात येताच पडले थंड!
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या आठवड्यात बुलडाणा अर्बनविरोधात आरोपांची राळ उडवल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या आज, १२ नोव्‍हेंबरला जाहीर केल्याप्रमाणे बुलडाण्यात दाखल झाले. मात्र कालपर्यंतचा आवेश, संताप कुठेतरी बुलडाण्याबाहेर सोडूनच आल्याचे चित्र दिसून आले. "बुलडाणा अर्बन'वरून आपली तोफ पुन्‍हा एकदा राज्य सरकारवर वळवून त्‍यांनी राजकीय भ्रष्टाचाराचे आरोप करत प्रहार केले. निर्भिडपणामुळे अगदी मंत्र्यांनाही दचकवून ठेवणाऱ्या सोमय्यांच्या आजच्या कोलांटउडीमुळे राजकीय तज्‍ज्ञही पेचात पडले आहेत. याला कारण गेल्या दोन दिवसांत आणि आज सकाळपर्यंत घडलेल्या पडद्यामागच्या घडामोडीही असल्याची चर्चाही होत आहे...

आज, १२ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास  किरीट सोमय्या यांनी बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्या मुख्यालयात जाऊन एक तास संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुकेश झंवर यांच्याशी चर्चा केली. दुपारी २ वाजता त्यांनी भाजपच्या शहर कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्‍यानंतर आपला रोख हा राजकीय भ्रष्टाचाराविरोधात आहे. बुलडाणा अर्बन तपासात सहकार्य करणार असल्याचा शब्द आपल्याला अध्यक्षांनी दिल्याचे ते म्हणाले. बुलडाणा अर्बनने अशोक चव्हाण यांना शेकडो कोटींचे कर्ज दिले आहे. अशोक चव्हाण व त्यांच्याशी संबंधित काही लोकांचे अपारदर्शक व्यवहार झाले आहेत. एका शाखेत काही बेनामी खाती आढळली आहेत. तिथल्या आर्थिक व्यवहारांतही हेराफेरी झाली आहे. मात्र बुलडाणा अर्बन आयकर विभागाला पूर्णपणे सहकार्य करणार आहे. आयकर विभागाला तपासासाठी वेळोवेळी जी माहिती हवी असेल ती बुलडाणा अर्बनकडून देण्यात येईल अशी चर्चा झाल्याचे किरीट सोमय्या म्हणाले. आमची लढाई ही राजकीय भ्रष्टाचाराविरोधात आहेत. तो भ्रष्टाचार कमी झाल्यास खालचे करप्शनही आपोआप कमी होईल, अशी पुस्तीही सोमय्यांनी जोडली. बुलडाणा अर्बन संदर्भात वारंवार विचारूनही सतर्क होत त्‍यांनी आपला "रोख' राजकीय भ्रष्टाचारावरच केंद्रीत केल्याचे दिसून आले.

३१ डिसेंबरपर्यंत ४० मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार
राज्यातील ठाकरे- पवार सरकारने लूट चालवली आहे. राज्यात लुटीचे साम्राज्य आहे. अर्धा डझन मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आले आहेत. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत अलिबाबा चाळीस चोरांच्या सरकारमधील ४० मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आणणार असल्याचे ते म्हणाले. बुलडाणा जिल्ह्यात येताच मला आकाश फुंडकरांनी अनिल देशमुखांचे गोडाऊन दाखविले, असेही सोमय्या म्हणाले. मी जी माहिती बाहेर आणतोय ती खोटी असेल तर मला जेलमध्ये टाका. आपल्या पाठपुराव्यांमुळे ठाकरे सरकारमधील अर्धा डझन मंत्री जेलमध्ये आहेत, काही जेलच्या वाटेवर आहेत, असेही सोमय्या म्हणाले. उद्धव ठाकरे यांना कोरोनाच्या काळात मान वर करायलाही वेळ मिळाला नाही. कारण ते पैसे मोजत होते, असे सोमय्या म्हणाले. उद्धव ठाकरेंनी पत्नीच्या नावावर १९ अनधिकृत बंगले बांधले होते, ते वाचवण्यात मुख्यमंत्री व्यस्त होते. मुख्यमंत्र्यांचे सेक्रेटरी मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगला बांधला होता. तो वाचवण्यात मुख्यमंत्री व्यस्त होते, असा आरोपही सोमय्यांनी केला. कोविड काळात अनिल परब यांनी दापोलीला फाईव्ह स्टार रिसॉर्ट बांधले. त्याला मदत करण्यात उद्धव ठाकरे व्यस्त होते, असेही ते म्‍हणाले. बुलडाणा शहरात येण्याचा हेतू साध्य झाला का, या प्रश्नावर ते म्हणाले, की बुलडाणा अर्बनकडून हवी ती माहिती मिळाली आहे व तपासाला सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे, असेही ते म्हणाले. शहर भाजपा कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर, योगेंद्र गोडे, शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा उपस्थित होते.

असा राहिला सोमय्यांचा आजचा दिवस...

तत्पूर्वी, पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी ते हावडा एक्स्प्रेसने शेगावात दाखल झाले. त्यानंतर विश्रामगृहात जाऊन त्‍यांनी साडेआठला गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली. सव्वा नऊला मंदिरातून बाहेर पडले. साडेनऊच्या सुमारास ते शेगावमधून खामगावकडे निघाले. खामगावमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला त्‍यांनी भेट देऊन राज्‍य सरकारवर टीका केली. संपूर्ण महाराष्ट्र एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी उभा आहे. आंदोलनकर्त्या दाेन हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पण एक दिवस हा महाराष्ट्र ठाकरे-पवारांना निलंबित केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका त्‍यांनी यावेळी केली. बुलडाण्याकडे येताना त्‍यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांशीही संवाद साधून राज्‍य सरकारवर पुन्‍हा टीकास्‍त्र सोडले. बुलडाण्यात आल्यानंतर विश्रामगृहावरून भाजप नेते योगेंद्र गोडे यांच्या निवासस्थानी श्री. सोमय्या गेले. तिथे सुमारे तासभर ते थांबले. त्‍यानंतर साडेबाराच्या सुमारास त्‍यांनी बुलडाणा अर्बन गाठली. बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. दीडनंतर ते भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात गेले. तिथे पक्ष कार्यकर्त्यांशी दोन वाजेपर्यंत संवाद साधला. दुपारी २ वाजता भाजपच्या शहर कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्‍यानंतर पुन्‍हा श्री. गोडे यांच्या निवासस्‍थानी गेले. तिथून त्‍यांनी तीनच्या सुमारास अकोल्याकडे रवाना झाले.

पहा व्हिडिओ ः