‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे भारताची ताकद जगासमोर; बुलढाण्यात तिरंगा रॅलीद्वारे सैनिकांच्या शौर्याला सलाम

 

बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या यशस्वी कारवाईने भारताची सैनिकी ताकद आणि जागतिक स्तरावरील भूमिका अधोरेखित झाली आहे. या पार्श्वभूमीवर, देशभरात सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन होत आहे. अशाच भावनांनी भारलेल्या वातावरणात, बुलढाणा शहरात आज २० मे रोजी सर्वपक्षीय तिरंगा रॅली काढण्यात आली.

ही रॅली भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरून निघालेली रॅली संगम चौक, जयस्तंभ चौक, बाजार गल्ली, कारंजा चौक, चिखली रोड आणि सर्क्युलर रोड मार्गे शहीद जवान स्मारकापर्यंत नेण्यात आली. येथे शहीद जवानांना सामूहिक अभिवादन करण्यात आले.

Related img.
यावेळी बोलताना विजयराज शिंदे म्हणाले, “भारतीय सैन्यदलाने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे देशद्रोह्यांना व दहशतवाद्यांना धडा शिकवला. बुलढाण्यातून भारतीय सैनिकांना एकात्मतेचा, अभिमानाचा व प्रोत्साहनाचा संदेश देण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती.”
Related img.
कर्नल सुहास जतकर यांनीही यावेळी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “दहशतवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हल्ल्याचा हवेतच पाडाव केला. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे केवळ सैनिकी मिशन नसून, प्रत्येक भारतीयाच्या अस्मितेचा भाग आहे.”
सैनिकांच्या मनोबलासाठी, त्यांच्या पराक्रमाचे कौतुक करण्यासाठी आणि देशप्रेम जागवण्यासाठी ही तिरंगा रॅली प्रेरणादायी ठरली.