अरे बाप्पो .. बुलढाणा शहरातल्या म्हाडा कॉलनी परिसरात पुन्हा एक नव्हे तब्बल तीन अस्वलांचा वावर; रात्री बाहेर निघू नका....
Mar 28, 2026, 18:27 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहराच्या शेवटच्या टोकावर आणि जंगला लगत असलेल्या म्हाडा कॉलनी परिसरात पुन्हा एकदा वन्य प्राण्यांचा वावर दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी उशिरा रात्रीच्या सुमारास या परिसरात तब्बल तीन मोठी अस्वले मुक्त संचार करताना आढळून आली.
स्थानिक नागरिकांनी या अस्वलांचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून, तो सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिनाभरापासून या भागात कोणत्याही वन्य प्राण्याचे दर्शन झाले नव्हते. त्यामुळे अचानक एकाच वेळी तीन अस्वले दिसल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
म्हाडा कॉलनी परिसर हा जंगलालगत असल्याने याठिकाणी पूर्वीही अस्वल, बिबट्या यांसारख्या वन्य प्राण्यांचा वावर अधूनमधून आढळत असतो. मात्र, अलीकडील घटनेमुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान, वन विभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, एकटे फिरू नये तसेच लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, असे आवाहन केले आहे. कोणत्याही वन्य प्राण्याचे दर्शन झाल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, वन विभागाने गस्त वाढवण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.