एक-दोन नव्हे... चक्क चार बाळांना दिला जन्म! जळगाव तालुक्यातील आदिवासी महिलेची घरातच प्रसूती; आता झाली ७ लेकरांची माय ! वैद्यकीय क्षेत्रही चक्रावले
चारबनसारख्या दुर्गम आदिवासी भागात घडलेली ही घटना अत्यंत दुर्मिळ मानली जात आहे. जुळी किंवा तिळी अपत्ये जन्माला येण्याच्या घटना अधूनमधून घडत असल्या, तरी एकाच प्रसूतीत चार बाळांचा जन्म होणे अत्यंत विरळ असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत. त्यातही ही प्रसूती रुग्णालयाऐवजी घरातच झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
प्रसूतीनंतर माता आणि चारही नवजात बाळांना तातडीने जळगाव जामोद येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीत माता व बाळांची प्रकृती स्थिर असल्याचे आढळले. मात्र प्रसूती मुदतपूर्व झाल्याने आणि प्रत्येक बाळाचे वजन अवघे सुमारे ९०० ग्रॅम असल्याने अधिक उपचारासाठी माता व चारही बाळांना खामगाव येथील जिल्हा उपसामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
या घटनेला आणखी एक वेगळा पैलू म्हणजे रियाणी सस्त्या यांना यापूर्वी दोन मुली आणि एक मुलगा आहे. आता एकाच वेळी चार अपत्यांचा जन्म झाल्याने त्यांच्या कुटुंबातील मुलांची संख्या सात झाली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात या कुटुंबाची चर्चा रंगली असून गावकऱ्यांकडून माता व नवजात बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली जात आहे.एकाच प्रसूतीमध्ये चार बाळांचा जन्म होण्याच्या दुर्मिळ घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातही कुतूहल निर्माण झाले असून, आदिवासी भागातील या अनोख्या घटनेची जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू आहे.