ना होर्डिंग, ना डिजिटल बॅनर; दुष्काळाच्या सावटात प्रतापराव जाधवांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा होणार! शिवसैनिकांना थेट आदेश; शुभेच्छांच्या जाहिरातबाजीऐवजी गरजूंच्या सेवेला प्राधान्य!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २५ नोव्हेंबर रोजीचा वाढदिवस होर्डिंग, डिजिटल बॅनर आणि दिखाऊ जाहिरातबाजीवर खर्च न करता 'सेवा सप्ताह' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शुभेच्छांचे फलक लावण्याऐवजी गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घ्या, असे आवाहन शिवसैनिकांना करण्यात आले आहे.यंदा पावसाच्या दीर्घ खंडामुळे बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. अशा परिस्थितीत वाढदिवसाचा जल्लोष करण्याऐवजी सामाजिक बांधिलकी जपत गरजूंच्या सेवेला प्राधान्य देण्याची भूमिका प्रतापराव जाधव यांनी घेतली आहे.

शेतकऱ्यांसाठी शासनदरबारी पाठपुरावा!

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळावा, यासाठी प्रतापराव जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले. राज्य शासनाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांचा समावेश झाला आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक जलसाठा आरक्षित ठेवून प्रकल्पांमधील अतिरिक्त पाणी पिकांच्या सिंचनासाठी उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी शासनाकडे केली होती.

 सेवा सप्ताहात विविध समाजोपयोगी उपक्रम!

प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात शेतकरी मार्गदर्शन शिबिरे, महाआरोग्य शिबिरे, रक्तदान, नेत्रतपासणी, मोतीबिंदू तपासणी, दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.याशिवाय आयुर्वेदिक शिबिरे, महिला बचत गट व स्ट्रीट फूड विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण, डॉक्टर, परिचारिका, आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविकांचा सन्मान करण्यात येणार आहे. 'रेबीज फ्री सिटी' अभियान, रोबोटिक सर्जरी युनिट सुविधेशी संबंधित उपक्रम, एनएबीएल कार्यशाळा आणि टू-डी इको तपासणी शिबिरांचेही नियोजन करण्यात आले आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

 शुभेच्छा द्यायच्याच असतील तर गरजूंची सेवा करा!

राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या होर्डिंगबाजी आणि जाहिरातींवरील खर्चाला यंदा फाटा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसैनिकांनी वाढदिवसाचे होर्डिंग किंवा डिजिटल बॅनर न लावता तो खर्च समाजोपयोगी उपक्रमांसाठी करावा. गरजूंच्या मदतीसाठी प्रत्यक्ष पुढाकार घेऊन सेवा सप्ताह साजरा करावा, असे आवाहन जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे आता जिल्हाभरात कोणकोणते उपक्रम राबविले जातात आणि त्याचा किती गरजू नागरिकांना लाभ मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.