हेल्मेट नाही, कागदपत्रे नाहीत, ट्रिपल सीट... डोणगावात पोलिसांचा अचानक धडाका; २० दुचाकीस्वार थेट जाळ्यात!

 
 मेहकर (अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांवर डोणगाव पोलिसांनी शुक्रवारी अचानक धडक कारवाई करत तब्बल २० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. स्थानिक बसस्थानक परिसरात झालेल्या या मोहिमेमुळे नियमबाह्य वाहन चालवणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

 ​​

पोलीस उपनिरीक्षक विजय अजमिरे आणि वाहतूक पोलीस हर्षे सहगल यांच्या संयुक्त पथकाने बसस्थानक परिसरात ही विशेष तपासणी मोहीम राबवली. वाढती रहदारी आणि अपघातांचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी विनाहेल्मेट प्रवास करणारे, ट्रिपल सीट वाहन चालवणारे, वैध कागदपत्रांशिवाय वाहन चालवणारे तसेच वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांची कसून तपासणी केली.अचानक उभारलेल्या तपासणी नाक्यामुळे अनेक वाहनचालकांची धावपळ उडाली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २० दुचाकीस्वारांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

विशेष म्हणजे, पोलिसांनी केवळ दंड वसूल करण्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता सर्व संबंधित वाहनचालकांना एकत्र करून वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगितले. हेल्मेटचा वापर, आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे, ट्रिपल सीट टाळणे आणि वेगमर्यादेचे पालन करणे ही प्रत्येक वाहनचालकाची जबाबदारी असल्याचे पीएसआय विजय अजमिरे यांनी स्पष्ट केले.

यापुढेही अशा स्वरूपाच्या धडक मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नसल्याचा इशाराही पोलिसांनी दिला.