“कामात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही!” — चिखलीत महसूलमंत्र्यांचा प्रशासनाला कडक इशारा! नागरिकांचे ऐकून घेतले गाऱ्हाणे..
Apr 21, 2026, 09:36 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काल चिखली दौऱ्यावर आले होते. यावेळी तहसील कार्यालयात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांच्या विविध समस्यांचा थेट आढावा घेत प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
या जनसंवाद कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ११० हून अधिक निवेदने प्रशासनाकडे प्राप्त झाली. महसूलमंत्र्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या तक्रारी व अडचणी जाणून घेतल्या. प्राप्त निवेदनांवर तत्काळ निर्णय घेण्यासाठी त्यांनी तहसील कार्यालयातच विविध विभागांचा आढावा घेतला.
कार्यक्रमाला आमदार श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, तसेच राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, अजिंक्य घोडके, प्रेश थोरात, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार व विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
जनसंवाद कार्यक्रमात मालकी हक्क पट्टे, रस्ते, वाळू प्रश्न, कृषी व शेतकरी आत्महत्या, घरकुल, पाणीपुरवठा, क्रीडा, आरोग्य व बांधकाम यांसारख्या विविध विषयांवरील निवेदने मोठ्या प्रमाणात प्राप्त झाली. अनेक नागरिक वैयक्तिक समस्याही घेऊन उपस्थित होते. सर्व निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना महसूलमंत्र्यांनी दिल्या.
यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले की, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मंडळस्तरावर ‘छत्रपती महाराजस्व शिबिर’ राबविण्यात येत असून शासनाच्या योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात न थांबता प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन काम करावे. कामकाजात हलगर्जीपणा आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियमित आढावा घ्यावा, तसेच कोणताही पात्र लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित राहू नये, ही शासनाची प्राथमिकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.