पावसाची चाहूल देणारा ‘नवरंग’ लोणार परिसरात दाखल!आकर्षक शिट्टी आणि नऊ रंगांच्या छटांनी पक्षीप्रेमींना भुरळ...
May 25, 2026, 08:59 IST
लोणार (प्रेम सिंगीं:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पावसाच्या आगमनाची चाहूल देणारा आणि आपल्या आकर्षक रंगसंगतीमुळे पक्षीप्रेमींना भुरळ घालणारा ‘नवरंग’ अर्थात *इंडियन पिट्टा* यंदाही लोणार परिसरात दाखल झाला आहे. हिरवा, निळा, पिवळा, काळा, पांढरा, केशरी आणि लाल अशा विविध रंगांची उधळण अंगावर मिरवणारा हा दुर्मीळ स्थलांतरित पक्षी सध्या निसर्गप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.
शरीरावर नऊ रंगांच्या छटा असल्यामुळे या पक्ष्याला ‘नवरंग’ असे नाव पडले आहे. पावसाळ्यापूर्वी या पक्ष्याचे आगमन होत असल्याने ग्रामीण भागात त्याला पावसाचा दूत मानले जाते. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सुरेल शिट्टीमुळे वातावरणात एक वेगळीच निसर्गमय अनुभूती निर्माण होत आहे.
‘मी लोणारकर’ टीमचे पक्षी निरीक्षक उमेश चिपडे आणि मानद वन्यजीव रक्षक सचिन कापुरे यांनी या पक्ष्याच्या आगमनाची नोंद घेत त्याचे सुंदर छायाचित्रण कॅमेऱ्यात टिपले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन पिट्टा हा पक्षी प्रामुख्याने झाडाझुडपांच्या परिसरात, जमिनीवर किंवा कमी उंचीच्या झाडांवर आढळतो.
विशेष म्हणजे प्रजनन काळात नर पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी विशिष्ट सुरांची शिट्टी वाजवतो. त्याचा हा मधुर आवाज पक्षीप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. लोणार परिसरातील जैवविविधतेत भर घालणाऱ्या या रंगीबेरंगी पाहुण्याच्या आगमनामुळे पक्षीनिरीक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.