बोराखेडीत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा उत्साहात शुभारंभ; ९१.४९ टक्के बालकांना डोस 'दोन थेंब जीवनाचे' संदेशाला प्रतिसाद; बोराखेडी आरोग्य केंद्रात ५,२६४ बालकांचे लसीकरण...
मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ५५ लसीकरण बूथ, ८ मोबाईल पथके तसेच मोताळा बसस्टॉप आणि वाघजाळ फाटा येथे २ ट्रान्झिट पथके कार्यरत होती. एकूण ६५ पथकांनी समन्वयाने काम करत लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविली. आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवकांनी घरोघरी जनजागृती करत पालकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले.
यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व पालकांना आवाहन करण्यात आले की, ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत आणि कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. "दोन थेंब जीवनाचे" हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून पोलिओमुक्त भारत घडविण्याचा संकल्प अधिक बळकट करण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, अद्याप लसीकरणापासून वंचित राहिलेल्या पात्र बालकांपर्यंत पोलिओ प्रतिबंधक डोस पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न सुरू असून, सर्व पालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन बोराखेडी येथील वैद्यकीय अधिकारी विवेक थिगळे यांनी केले आहे.