शेगाव येथे राष्ट्रीय महाआरोग्य मेळावा; राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना आमंत्रण; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले निमंत्रण..!

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : संत नगरी शेगाव येथे नोव्हेंबर २०२५ मध्ये आयोजित राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते व्हावे, या संदर्भाचे औपचारिक निमंत्रण केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) व आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले. गुरुवारी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या स्नेहपूर्ण भेटीत जाधव यांनी हे निमंत्रण राष्ट्रपतींना सुपूर्त केले.

यावेळी आयुर्वेद व आरोग्य या विषयावरही सविस्तर चर्चा झाली. आयुष मंत्रालयातर्फे होणाऱ्या या राष्ट्रीय पातळीवरील महाआरोग्य मेळाव्याचे उद्दिष्ट म्हणजे भारतीय पारंपरिक वैद्यक प्रणालींची — आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, सोवा-रिग्पा आणि होमिओपॅथी — समृद्ध परंपरा, वैज्ञानिक आधार आणि जनकल्याणकारी स्वरूप जनतेसमोर प्रभावीपणे मांडणे हे आहे.
प्रतिबंधात्मक, प्रोत्साहक आणि उपचारात्मक आयुष प्रणालींचे प्रदर्शन,
सार्वजनिक आरोग्य जागरूकता व निरोगी जीवनशैलीचा प्रचार,
संशोधन व ज्ञानविनिमयासाठी विद्वान, संशोधक, विद्यार्थी व शेतकऱ्यांना व्यासपीठ,
औषधी वनस्पती उत्पादक, एमएसएमई व स्टार्टअप्ससाठी प्रोत्साहन,
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांत आयुष समन्वय, फिट इंडिया मूव्हमेंट, पर्यावरणपूरक आरोग्यसेवा व पारंपरिक औषधज्ञान संवर्धन यावर विशेष चर्चासत्रे ही या आरोग्य मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
केंद्रीय मंत्री जाधव यांनी सांगितले की, “बुलढाणा हा राष्ट्रमाता जिजाऊंची जन्मभूमी, संत गजानन महाराजांची समाधीभूमी आणि जागतिक दर्जाचे लोणार सरोवर लाभलेली भूमी आहे. अध्यात्म, परंपरा आणि विज्ञानाचा संगम साधणाऱ्या या ठिकाणी होणारा महाआरोग्य सोहळा ऐतिहासिक ठरेल. राष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे या मेळाव्याला अधिक प्रेरणादायी स्वरूप लाभेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.