अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपी युवकास तीन वर्षांचा सश्रम कारावास व दंड:
बुलढाणा न्यायालयाचा निकाल...

 
 बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :चिखली तालुक्यातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रशांत विश्वनाथ काळे (वय २६) या युवकास तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि चार हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल विशेष न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी मंगळवारी सुनावला.

आरोपीवर अल्पवयीन मुलीच्या विनय भागाचा प्रयत्न, अश्लील वर्तन, धमकी देऊन घाबरवणे तसेच लैंगिक स्वरूपाचा अत्याचार करण्याचे गंभीर आरोप होते. न्यायालयाने सादर पुराव्यांनुसार सर्व आरोप सिद्ध झाल्याचे नमूद करून आरोपीस दोषी ठरवले व एकत्रित शिक्षा ठोठावली.
ही घटना ३० सप्टेंबर २०२१ रोजी चिखली तालुक्यात घडली. पीडितेच्या घरात रंगकाम सुरू असताना आरोपीने वाईट उद्देशाने घरात प्रवेश करून मुलीचे हात पकडले, जबरदस्ती मिठी मारली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. पीडिता आरडाओरड करताच तिची आई आणि बहिणी धावत आल्या, तेव्हा आरोपी तेथून पळून गेला.
यानंतर पीडितेच्या वडिलांनी तत्काळ पोलिसात तक्रार नोंदवली. तपासादरम्यान साक्षीदारांचे जबाब, जन्म व वैद्यकीय पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. सरकारी वकील वसंत लक्ष्मण भटकर यांनी एकूण १० साक्षीदारांचे जबाब नोंदवून आरोपीचा दोष सिद्ध केला.
न्यायालयाने आरोपीस 
लैंगिक अत्याचाराबद्दल तीन वर्षांचा सश्रम कारावास व ₹२,००० दंड,
विनयभंग व अश्लील वर्तनाबद्दल एक वर्षाचा कारावास व ₹१,००० दंड,धमकी दिल्याबद्दल: एक वर्षाचा कारावास व ₹१,००० दंड अशी शिक्षा सुनावली.
एकूण दंडापैकी ₹२,००० रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.