चिखली पंचायत समितीत मनसेचा राडा; ३ तासांपासून मांडला ठिय्या! वाचा काय आहे कारण..

​​​​​​​

 
चिखली(गणेश धुंदळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली पंचायत समिती कार्यालयात आज २१ जुलैच्या दुपारपासून चांगलाच राडा सुरू आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे गेल्या ३ तासांपासून पंचायत समिती कार्यालयात ठिय्या मांडून आहेत. शेलुद येथील ग्रामसेविकेवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. बांधकाम  कामगार कल्याण योजनेचे नुतणीकर करून घेण्यासाठी स्वाक्षरी देण्यास ग्रामसेविका टाळाटाळ करते, कामगारांना अर्वाच्य भाषेत बोलते असा आरोप कामगारांनी केला, ही बाब कामगारांनी गणेश बरबडे यांच्या कानावर टाकताच बरबडे पंचायत समिती कार्यालयात ठिय्या मांडून आहेत.
 

राज्य सरकारकडून बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी विशेष योजना राबविण्यात येते. एका वर्षात किमान ९० दिवस बांधकाम कामगार म्हणून काम करणारे मजूर यासाठी पात्र असतात. त्यासाठी  ९० दिवस बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवकाने द्यायचे असते. मात्र शेलुद येथील ग्रामसेविकेने सदर प्रमाणपत्रावर सही घेण्यासाठी गेलेल्या कामगारांना सही देण्यास टाळाटाळ केली. "मी तुमच्या कागदावर सही करत नाही तुमच्याकडून काय होते ते करून घ्या" असे ग्रामसेविकेने कामगारांना म्हटल्याचे कामगारांनी सांगितले. कामगारांनी मनसे जिल्हाध्यक्ष बरबडे यांना सदर प्रकरण अवगत करून दिले.

 त्यानंतर बरबडे यांनी मनसे पदाधिकारी व कामगारांना घेऊन पंचायत समिती कार्यालय गाठले.शेलूदच्या ग्रामसेविकेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान यावेळी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी हजर नसल्याने त्यांचा संताप अनावर झाला. गटविकास अधिकाऱ्यांनी आणि जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी फोनच उचलले नसल्याचे बरबडे यांनी सांगितले. ग्रामसेविकेवर कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करू अशी प्रतिक्रिया बरबडे यांनी दिली आहे.