चिखली तालुक्यातील "या" ८ गावांसाठी आमदार श्वेताताईंचे केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांना निवेदन! विषय आहे महत्वाचा....
Jan 9, 2024, 12:10 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):मतदार संघातील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेले शेतकरी व्यापारी नोकरदार व सर्वसामान्य नागरिकांनी नागरिकांच्या सुविधेसाठी आठ गावांमध्ये राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा सुरू कराव्या अशी मागणी आ. श्वेताताई महाले यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दि. ८ जानेवारी रोजी डॉ. कराड बुलढाणा येथे एका कार्यक्रमासाठी आले असता आ. महाले यांनी त्यांना आपले निवेदन सादर केले.
जाहिरात 👆
चिखली मतदारसंघांमध्ये येणाऱ्या चिखली व बुलढाणा या दोन तालुक्यांमधील काही महत्त्वाच्या गावांमध्ये राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा नसल्यामुळे स्थानिक शेतकरी व गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या गावांसाठी राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा नसल्यामुळे नागरिकांना इतर गावातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये व्यवहार करावा लागतो. त्यामुळे त्यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. बुलडाणा जिल्हास्तरीय बँकर समितीने मेरा बु, मंगरुळ नवघरे, साखळी बु व इसोली या गावात सुरू करण्याबाबत राज्यस्तरीय बँकर समितीकडे शिफारस सुद्धा केलेली असल्याचा उल्लेख आ. महाले यांनी आपल्या निवेदनात केला आहे.
राष्ट्रीयकृत बँकेच्या नवीन शाखा सुरू करण्यासाठीच्या निकषांमध्ये बसणाऱ्या म्हसला बु. ( ता. बुलढाणा ), मेरा बु. ( ता. चिखली ), करवंड ( ता. चिखली ), कोलारा ( ता. चिखली ), मंगरूळ नवघरे ( ता. चिखली ), दुधा ( ता. बुलढाणा ), चांडोळ ( ता. बुलढाणा ) व इसोली ( ता. चिखली ) या गावांमध्ये राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरू करण्याची आवश्यकता आहे असे या निवेदनात नमूद केले आहे. ही सर्व गावे १० ते १५ हजारांहून अधिक लोकसंख्येची महसूल मंडळाची गावे आहेत शिवाय सर्व गावांमध्ये मोठी बाजारपेठ आहे आणि जवळच्या गावांसाठी व्यापाराचे ठिकाण आहे. त्यामुळे निवेदनात उल्लेख केलेल्या ८ गावांमध्ये राष्ट्रीयकृत बँकेच्या नवीन शाखा सुरू करण्यात याव्या अशी मागणी आ. श्वेताताई महाले यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे केली आहे. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार चैनसुख संचेती, जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे माजी आमदार शिंदे याप्रसंगी उपस्थित होते.