आमदार श्वेताताई महाले यांच्या पाठपुराव्याला यश; गोदरी, डोंगरशेवली आणि मर्दडी येथील धार्मिक स्थळांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा...

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील तीन धार्मिक स्थळांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. या संदर्भातील शासन आदेश १९ जून रोजी निर्गमित करण्यात आला.
या योजनेसाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी विशेष पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे स्थानिक नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.
दर्जा प्राप्त झालेल्या तीर्थस्थळांमध्ये रेणुका संस्थान, गोदरी (ता. चिखली), श्री क्षेत्र मर्दडी देवी संस्थान, दुधा (ता. बुलडाणा) आणि श्री सोमनाथ महाराज संस्थान, डोंगर शेवली (ता. चिखली) या धार्मिक स्थळांचा समावेश आहे.
या तीर्थस्थळांचा प्रस्ताव राज्य निकष समितीच्या ८ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला होता. समितीने प्राप्त कागदपत्रांची तपासणी करून नियमानुसार या स्थळांना ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शासनाने अधिकृत आदेश निर्गमित केला आहे.
या निर्णयामुळे संबंधित स्थळांमध्ये पायाभूत सुविधा, सौंदर्यीकरण आणि भाविकांसाठी आवश्यक व्यवस्था उभारण्यास मदत होणार असून, धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल.