आमदार संजय गायकवाड यांचे पोलिसांवर गंभीर आरोप! म्हणाले, एखादा कायदा केला की यांचा हफ्ता वाढतो..पोलिसांनी मनात आणलं तर...
Apr 25, 2025, 18:17 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड त्यांच्या रोखठोक विधानासाठी प्रसिद्ध आहेत. आज, एका पत्रकार परिषदेत त्यांनी असेच एक बिनधास्त विधान केले..२७, एप्रिलला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा येथे आभार सभेसाठी येणार आहेत. या दौऱ्याची माहिती देण्यासाठी आ. गायकवाड यांनी त्यांच्या मातोश्री जनसंपर्क कार्यालयात एक पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना, त्यांनी पोलिसांवर चांगलेच तोंडसुख घेतले. पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट भारत आणि महाराष्ट्र सोडून कुठेच नसेल असा आरोप आमदार गायकवाड यांनी केला. याशिवाय सरकारने एखादा कडक कायदा केला की पोलिसांचा एक हप्ता वाढतो असेही आ.आमदार गायकवाड म्हणाले.
शिवसेना नेते अर्जुन खोतकर व त्यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी instagram वर आली आहे या संदर्भात एका प्रश्नाला उत्तर देताना आ.गायकवाड म्हणाले की, आम्हालाही धमक्या येतात. समाजात चांगलं काम करत असेल तर धमक्या येणारच.. पुढे बोलताना ते म्हणाले की पोलीस वाले काय करू शकत नाहीत. माझ्या घरासमोरची गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला त्यात पोलिसांनी काही केले नाही, पोलिसांसारखा अकार्यक्षम डिपार्टमेंट महाराष्ट्रात आणि भारत सोडले तर जगात कुठेच नसेल. शासनाने कोणताही कायदा केला की पोलिसांचा एक हप्ता वाढला, गुटखाबंदी केली की यांचा हप्ता वाढला, दारूबंदी केली की यांचा हप्ता वाढला असे आ.गायकवाड म्हणाले. पोलिसांनी इमानदारपणे काम केले तर जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते, त्यांनी फक्त सद्रक्षणाय खलनिग्रहाय या त्यांच्या ब्रीद प्रमाणे काम केले पाहिजे असे आ.गायकवाड म्हणाले.