अल्पवयीन मुलीचा २७ वर्षीय तरुणाशी लावला विवाह; आठ महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर अत्याचाराचे प्रकरण उघड! शेगावात पतीसह आई-वडील, सासू-सासरे अन् मामावर गुन्हा!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सध्या १७ वर्षे १० महिन्यांची आहे. विवाहासाठी आवश्यक असलेली वयोमर्यादा पूर्ण झालेली नसतानाही कुटुंबीयांनी संगनमत करून तिचा २७ वर्षीय तरुणाशी विवाह लावून दिल्याचा आरोप आहे. या बालविवाहात दोन्ही कुटुंबांतील सदस्यांसह मामाचाही सहभाग असल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. विवाहानंतर पतीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. पीडिता सध्या आठ महिन्यांची गर्भवती असून, तिच्या तोंडी जबाबाच्या आधारे पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देणे कायद्याने प्रतिबंधित आहे. तसेच विवाह झाला असला तरी अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पॉक्सो कायद्यातील तरतुदी लागू होतात. या घटनेने बालविवाह प्रतिबंधक यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७४०/२०२६ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ३७६(२)(एन), ३७६(३), बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ मधील कलम ९, १०, ११ तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पॉक्सो) २०१२ मधील कलम ४ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे प्राप्त माहितीत नमूद आहे.