मलकापुरात अल्पवयीन तरुणीची प्रसूती; पतीवर पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल..!

 
 मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :अल्पवयीन तरुणीला दिशाभूल करून रुग्णालयात आणून प्रसूती केल्याप्रकरणी, तपासाअंती ती अल्पवयीन असल्याचे उघड झाले. यावरून रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुरेखा बोरले यांच्या फिर्यादीवरून संबंधित तरुणाच्या विरोधात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलकापूर येथील ४० बिघा परिसरातील बोरले हॉस्पिटल मध्ये ३ सप्टेंबर रोजी १६ वर्षीय तरुणीला प्रसूतीसाठी आणण्यात आले. त्या वेळी तिच्या पतीकडे आधारकार्ड व इतर कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र, प्रसूतीची वेळ जवळ आल्याने "आधी प्रसूती करा, तोवर कागदपत्रे देतो," असे तिच्या पतीने सांगितले.
यानंतर पतीने दिलेल्या कागदपत्रांची तपासणी केली असता ती तरुणी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणाची माहिती हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. सुरेखा सुहास बोरले यांनी ८ सप्टेंबर रोजी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात दिली.
तक्रारीवरून पोलिसांनी सुरज ग्यारीलाल चव्हाण (वय २३, रा. जामदे, ता. साक्री, जि. धुळे, ह.मु. मडापुरी) याच्याविरुद्ध पॉक्सो कायदा कलम ४, ६, तसेच बीएनएस कलम ६४(एम)(एफ), आणि बालविवाह प्रतिबंध अधिनियम कलम ९, १०, ११ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदर आरोपीचा मूळ पत्ता मुक्ताईनगर तालुक्यातील मडापुरी येथील असल्याने मलकापूर शहर पोलिसांनी हा गुन्हा झिरो एफआयआर म्हणून मुक्ताईनगर पोलिसांकडे वर्ग केला आहे.