मासिक पाळी शाप नव्‍हे वरदानच;  कोलवडच्या शाळेत स्‍नेहल कदम-चौधरी यांचे व्याख्यान

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आजही समाजात मासिक पाळीविषयी गैरसमज आहेत. आजही तरुणी याविषयी बोलत नाहीत. हेच हेरून क्षितिज फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा स्‍नेहल चौधरी- कदम यांनी बुलडाणा तालुक्यातील कोलवड येथील विद्या विकास विद्यालयातील तरुणींना ‘मासिक पाळी माझी मैत्रिण’ या विषयावर मार्गदर्शन केले. चला तरुणींनो मासिक पाळीविषयी बोलू काही... म्हणत तरुणींचे गैरसमज दूर केले.
कोलवड येथील विद्या विकास विद्यालयात आज, ३१ डिसेंबर रोजी मासिक पाळी माझी मैत्रिण या विषयावर क्षितीज फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा स्‍नेहल चौधरी- कदम यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुनील जवंजाळ होते. यावेळी स्‍नेहलताईंनी विद्यार्थिनींना मासिक पाळी ही शाप नसून, ती एक वरदान आहे. मासिक पाळी ही मैत्रिण आहे. या दिवसांत विशेष काळजी घ्यावी याबाबतही मार्गदर्शन केले. यावेळी मुंबईच्या कमफोर्थ संस्थेचे अध्यक्ष शेरिल गायकवाड यांच्या वतीने विद्यालयातील २०० तरुणींना सॅनेटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.