लोणारच्या सरकारी रुग्णालयात औषधांचा कारभार ‘ट्रेनीं’च्या हाती! फार्मासिस्टच नाही; रुग्णांच्या जीवाची जबाबदारी कोणाची?

 
 लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खाजगी मेडिकलवर नियमांचा बडगा उगारणारे प्रशासन सरकारी रुग्णालयाच्या बाबतीत मात्र डोळेझाक करतेय का? असा संतप्त सवाल लोणार ग्रामीण रुग्णालयातील परिस्थितीमुळे उपस्थित झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयातील फार्मासिस्ट पद रिक्त असून, दररोज शेकडो रुग्णांशी थेट संबंधित असलेल्या औषध विभागाचा कारभार सध्या शिकाऊ उमेदवारांच्या माध्यमातून सुरू असल्याची बाब समोर आली आहे.

औषध म्हणजे साधी वस्तू नव्हे. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाचे नाव, मात्रा, वेळ, औषधांचे परस्पर परिणाम आणि रुग्णाची परिस्थिती याबाबत योग्य दक्षता घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा संवेदनशील विभागात पात्र फार्मासिस्ट उपलब्ध नसताना शिकाऊ उमेदवारांकडून औषध वितरणाची व्यवस्था कितपत सुरक्षित आहे, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

खासगी मेडिकलला नियम, मग सरकारी रुग्णालयाला वेगळा न्याय का?

नोंदणीकृत फार्मासिस्टशिवाय औषध विक्रीच्या नियमांबाबत प्रशासन कठोर भूमिका घेत असल्याचे नागरिक पाहतात. मग शासकीय रुग्णालयातील औषध वितरणाच्या बाबतीत नियम आणि रुग्णांच्या सुरक्षिततेचे निकष काय आहेत? लोणार ग्रामीण रुग्णालयातील परिस्थितीमुळे हा प्रश्न थेट आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

रुग्णालयात दररोज ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. त्यातील अनेक रुग्ण आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबातील असतात. सरकारी रुग्णालयावर विश्वास ठेवून उपचारासाठी येणाऱ्या या रुग्णांना औषध वितरणात पात्र मनुष्यबळ उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी नाही का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

चुकीचे औषध गेले तर जबाबदारी कोणाची?

या परिस्थितीत सर्वात गंभीर प्रश्न रुग्णांच्या सुरक्षिततेचा आहे. औषध देताना काही चूक झाली, चुकीची मात्रा गेली किंवा औषधांच्या बाबतीत गंभीर गफलत झाली, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची राहणार? रुग्णालय प्रशासन, संबंधित अधिकारी की आरोग्य विभागाच्या वरिष्ठ यंत्रणेची? या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने देण्याची गरज आहे.दरम्यान, फार्मासिस्टची नियुक्ती होईपर्यंत रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था केल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, ही तात्पुरती व्यवस्था नेमकी किती काळ चालणार, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.

वैद्यकीय अधीक्षक म्हणतात—फार्मासिस्टची नियुक्ती झालीय, पण रुजू झालेले नाहीत

या प्रकरणी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले की, प्रशासकीय नियमानुसार यापूर्वी कार्यरत असलेल्या फार्मासिस्टची बदली झाली आहे. त्यांच्या जागी नवीन फार्मासिस्टची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबात वैद्यकीय समस्या निर्माण झाल्यामुळे ते अद्याप रुग्णालयात रुजू होऊ शकलेले नाहीत.

रुग्णांची संख्या मोठी असल्याने फार्मासिस्ट उपलब्ध नाही म्हणून औषध विभाग पूर्णपणे बंद ठेवता येणार नाही. त्यामुळे सध्या तात्पुरत्या स्वरूपात शिकाऊ उमेदवारांकडून औषध विभागाचे कामकाज सुरू आहे. मात्र, औषध वितरणात कोणतीही चूक होऊ नये यासाठी रुग्णालयातील अनुभवी कर्मचारी त्यांना मार्गदर्शन करत असून त्यांच्या कामावर लक्ष ठेवले जात असल्याचे वैद्यकीय अधीक्षकांनी स्पष्ट केले.तसेच पूर्णवेळ फार्मासिस्ट उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांकडे लेखी पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उत्तर द्यावे!

फार्मासिस्टची नियुक्ती होऊनही ते रुजू झाले नसतील, तर त्यांना पर्यायी पात्र फार्मासिस्ट उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कोणाची? महिनोन्‌महिने तात्पुरती व्यवस्था सुरू ठेवणे हा कायमस्वरूपी उपाय होऊ शकतो का? लोणारच्या ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून असलेल्या शेकडो रुग्णांच्या सुरक्षिततेचा विचार करून आरोग्य विभागाने यावर तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.
दरम्यान, लोणार ग्रामीण रुग्णालयातील औषध विभागात तातडीने पूर्णवेळ आणि अनुभवी फार्मासिस्ट उपलब्ध करून न दिल्यास वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अजितदादा पवार गटाचे शहराध्यक्ष तौफिक कुरेशी यांनी दिला आहे.