शेतकऱ्याच्या गोदामाला भीषण आग! ७ लाखांचे साहित्य, कापूस, गहू अन् मका जळून खाक; ऐन दिवाळीत देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर!
Advt 👆
कापूस, गहू, मका अन् ठिबक सिंचन साहित्य राख!
आगीच्या भक्ष्यस्थानी २२ क्विंटल कापूस, १४ क्विंटल गहू, ६ क्विंटल मका, चार एकरांचे ठिबक सिंचन साहित्य, चार ट्रॅक्टर ट्रॉली गुरांचा कुट्टी चारा तसेच सुमारे दीड लाख रुपये किमतीचे टीनपत्र्याचे शेड गेले. अचानक लागलेल्या आगीने संपूर्ण गोदामाला वेढा दिल्याने शेतकऱ्याच्या मेहनतीवर पाणी फिरले. ऐन दिवाळीत उदरनिर्वाहाचे साधनच जळून खाक झाल्याने देशमुख कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
आमदार गायकवाड, रविकांत तुपकरांकडून मदतीचा हात!
या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार संजयभाऊ गायकवाड यांनी ९ नोव्हेंबर रोजी गुगळी येथे जाऊन गुणवंत देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दिवाळीच्या सणातील अनावश्यक खर्चाला फाटा देत त्यांनी संकटग्रस्त कुटुंबाला ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. दरम्यान, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनीही देशमुख कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. तुपकर यांच्या हस्ते एक लाख रुपयांची आर्थिक मदत गुणवंत देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
दुःखाच्या प्रसंगी मदतीचा आधार!
एकीकडे कष्टाने उभे केलेले शेतमालाचे गोदाम आगीत जळून खाक झाले, तर दुसरीकडे संकटाच्या काळात लोकप्रतिनिधी आणि शेतकरी नेत्यांनी मदतीचा हात पुढे केला. या आर्थिक मदतीमुळे देशमुख कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. मात्र, झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी आणि शासनानेही या शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.