जिल्हा बँकेच्या रणांगणात मनोज कायंदेंचे बंड; शिंगणे-जाधवांच्या ‘सहकार’ पॅनलविरोधात ‘परिवर्तन’चा एल्गार! म्हणाले,केवळ ४–५ जागा मागितल्या होत्या,त्याही दिल्या नाही..!
बँकेच्या कारभारावर कायंदेंचे गंभीर आरोप..
पत्रकार परिषदेत मनोज कायंदे यांनी जिल्हा बँकेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बँक आर्थिक संकटात असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३०० कोटी रुपयांचे सुलभ कर्ज उपलब्ध करून दिल्यामुळे बँक सावरली आणि त्यानंतर बँक सातत्याने नफ्यात आली, असा दावा त्यांनी केला.मात्र, बँकेच्या कारभारात आपल्या विचारांच्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व नाकारण्यात आल्याचा आरोपही कायंदे यांनी केला. चार ते पाच जागांची मागणी करूनही एकही जागा न मिळाल्याने स्वतंत्र पॅनल उभारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘उमेदवार पळवापळवीसाठी राजकारण झाले’
विरोधकांकडून परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना फोडण्याचे, धमकावण्याचे तसेच त्यांच्याकडून दिशाभूल करणारे निवेदन करून घेण्याचे प्रयत्न झाल्याचा दावा कायंदे यांनी केला. आपण महायुतीचे आमदार असून, जिल्हा बँकेत गैरप्रकार आढळल्यास विधानसभेत आवाज उठवून ते रोखू, असा इशाराही त्यांनी दिला.
‘परिवर्तन’ पॅनलचे चेहरे जाहीर
परिवर्तन पॅनलमध्ये मंदाकिनी चांभारे पाटील, प्रतिभा टाले, योगेश गायकवाड, मनोज कायंदे, ज्ञानेश्वर पाटील, उज्वला मोरे, शिवनंदा खंड, शिवचंद्र तायडे या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. आणखी काही उमेदवार पॅनलमध्ये येणार असल्याचेही सांगण्यात आले.
२३ ऑगस्टच्या मतदानाकडे जिल्ह्याचे लक्ष
आमदार कायंदे यांनी बँकेच्या मतदारांवर दबाव आणला जात असल्याच्या चर्चांवरही भाष्य केले. ‘मी बँकेचा मतदार किंवा उमेदवार नाही. सत्तेचे विकेंद्रीकरण आणि सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी ही लढाई आहे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मतदानात केवळ आठ जागांचे निकाल कोणाच्या बाजूने लागतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. एकीकडे ‘सहकार’ पॅनलचे आधीच १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत; तर दुसरीकडे कायंदेंच्या परिवर्तन पॅनलने उर्वरित ९ जागांवर प्रस्थापितांना आव्हान दिले आहे.