जिल्ह्यात पोलीस दलात मोठे फेरबदल; चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील बदलले! भूषण गावंडे होतील नवे ठाणेदार; १८ अधिकाऱ्यांच्या बदली आदेशास पोलीस अधीक्षकांची मंजुरी....
Nov 4, 2025, 18:54 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा पोलिस अधीक्षक पदावरील वादाचे पडसाद शांत होताच नवे पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर फेरबदल केले आहेत. बुलढाणा जिल्हा पोलीस दल आस्थापना मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत एकूण १८ पोलीस निरीक्षक व निःशस्त्र सहायक पोलीस निरीक्षक यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले.
चिखलीचे विद्यमान ठाणेदार संग्राम पाटील यांची बदली सायबर सेल येथे करण्यात आली असून त्यांच्या जागी भूषण गावंडे यांची चिखली पोलीस ठाण्याला नियुक्ती करण्यात आली आहे. बदली झालेल्या सर्व अधिकारी/कर्मचार्यांनी तातडीने नवीन ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय, जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या बदल्यांमध्ये सोनाळ्याचे ठाणेदार सपोनि चंद्रकांत पाटील यांची पिंपळगाव राजा येथे बदली, तर पिंपळगाव राजाचे सपोनि मुकेश गुजर यांचा नियुक्ती आदेश वाचक शाखा, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, मलकापूर येथे करण्यात आला आहे.
एमआयडीसी मलकापूरचे संदीप काळे आता सोनाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार म्हणून काम पाहतील. खामगाव शहरचे सपोनि भागवत मुळीक यांची बदली हिवरखेड येथे, तर हिवरखेडचे सपोनि कैलास चौधरी यांची नियुक्ती नांदुरा येथे करण्यात आली आहे.
एमआयडीसी मलकापूरचे सपोनि हेमराज कोळी यांच्याकडे डायल ११२ दोषसिद्धी विभागाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. नांदुरा येथील सपोनि नरेंद्र पेन्दोर यांची बदली एमआयडीसी मलकापूरला करण्यात आली आहे.
दरम्यान, नियंत्रण कक्ष बुलढाणा येथील पोनि आशिष रोही आता आर्थिक गुन्हे शाखा, बुलढाण येथे काम पाहणार आहेत. शेगावचे पोनि नितीन पाटील यांची बदली जळगाव जमोद येथे करण्यात आली असून जळगाव जमोदचे पोनि श्रीकांत निचळ यांची नियुक्ती पासपोर्ट शाखा, बुलढाणा येथे करण्यात आली आहे. लोणारचे पोनि निमीष मेहेत्रे आता शेगाव येथे कार्यरत राहतील.आर्थिक शाखेचे पोनि प्रकाश सदगिर यांची बदली लोणार येथे झालेली आहे.
बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित गुन्हे, तपास कागदपत्रे, केस डायऱ्या, अर्ज चौकशा व इतर संबंधित नोंद योग्यरीत्या नव्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.जिल्हा पोलीस दलातील या मोठ्या फेरबदलामुळे आगामी काळात कायदा-सुव्यवस्थेच्या व्यवस्थापनात प्रशासनिक गती येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.