महावितरणवाल्यांनो खेड्यातल्या लोकांना जीव नसतोय काय? मान्सूनपूर्वतयारीच्या नावावर दिवसभर करतात बत्ती गुल! भर उकाड्यात लेकराबाळांनी कसं सहन करायचं? अंचरवाडी, शेळगाव आटोळ परिसरातील नागरिकांचा सवाल..

 
चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय... बातमीच जे हेडिंग वाचलंय ते खरं आहे.. जस काही गाव खेड्यातल्या लोकांना जीवच नसतो, दगडाचेच असतात ते असाच महावितरणवाल्यांचा समज झालाय..शहरात सरासरी कितीही मोठे कारण असले तरी तासाभरापेक्षा जास्त वेळ वीज बंद करत नाहीत.. मात्र मान्सूनपूर्वतयारीच्या नावाखाली गावखेड्यातील वीज मात्र तब्बल १० - १० तास बंद करण्यात येते..भर दुपारी गावखेड्यातील बंद केलेली वीज रात्री उशिरापर्यंत येत नाही, त्यामुळे प्रचंड उकाडा नागरिकांना सहन करावा लागतो, लहान सहान लेकराबाळांचे अक्षरशः प्रचंड हाल होतात..मात्र तरीही महावितरणवाल्यांच्या दगडाच्या काळजाला पाझर फुटत नाही..कारण बिचारे गावाकडचे लोक ते,करून करून काय करणार..? असेच त्यांना वाटते.. अंचरवाडी, शेळगाव आटोळ , देऊळगाव घुबे, मिसळवाडी या परिसरात तर महावितरण वाल्यांचा हा पराक्रम नित्याचाच झालाय..आज, १९ मे रोजी सकाळी १२ पासून बत्ती गुल असून रात्री उशिरापर्यंत वीज आलेली नव्हती..परिणामी प्रचंड उकाड्यामुळे लेकराबाळांचे हाल होतांना दिसले. दिवसभरात मान्सूनपूर्व तयारीसाठी किमान २ तास महावितरणने घ्यावेत, उर्वरित वेळेत सुरळीत वीजपुरवठा करावा. अन्यथा स्थानिक नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.