कर्जमाफी फसवीच ! रविकांत तुपकरांचा आरोप!जळगाव जामोद येथे केली कर्जमाफीच्या जी आर ची होळी;शेतकऱ्यांच्या घोषणांनी जळगाव शहर दणाणले..!
तुपकरांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा ! अन्यथा कपडे काढून ठोकेन.. तुपकरांचा इशारा; म्हणाले,सरसकट कर्जमुक्ती व हक्काच्या पिकविम्या साठी राज्यभर आंदोलन उभारणार
Jun 11, 2026, 14:17 IST
जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्य शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी असून त्यामध्ये लादलेल्या जाचक अटींमुळे बहुसंख्य शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. या फसव्या कर्जमाफीच्या निषेधार्थ आज जळगाव जामोद येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने रविकांत तुपकर व अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात कर्जमाफीच्या जी.आर.ची होळी करण्यात आली. त्यानंतर शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना शेतकरी नेते नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, शासनाने कर्जमाफी जाहीर केली असली तरी त्यामध्ये इतक्या अटी-शर्ती घालण्यात आल्या आहेत की राज्यातील दहा ते पंधरा टक्के शेतकरी देखील पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे ही कर्जमाफी नसून शेतकऱ्यांची थट्टा आहे. केंद्र सरकारने मोठ्या उद्योजकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज कोणत्याही अटींशिवाय राईट ऑफ केले, मात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देताना जाचक निकष लादले जात आहेत. हा दुजाभाव शेतकरी सहन करणार नाही, असे तुपकर यांनी स्पष्ट केले.
सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांना योग्य भाव मिळाला नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शेतमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करण्यात आले. त्यामुळे आज शेतकरी कर्जबाजारी झाला असून त्याला सरसकट कर्जमुक्ती देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. सरसकट कर्जमुक्ती, संपूर्ण सातबारा कोरा करणे आणि शेतमालाला हक्काचा भाव देणे या मागण्यांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा देत तुपकर म्हणाले की, जळगाव जामोद येथून आज आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला आहे. येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतील.
“शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारने करू नये. गावगाड्यातील शेतकरी खवळला तर सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पिकविमा मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही,” असा निर्धार रविकांत तुपकर यांनी यावेळी व्यक्त केला.
रविकांत तुपकरांचा अधिकाऱ्यांना ठोकून काढण्याचा इशारा..
यावेळी रविकांत तुपकर यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व पीकविमा कंपनीचे अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले.. पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी घेऊन सुनावण्या घ्या आणि अहवाल शासनाला पाठवून कंपनीला नुकसाग्रस्त शेतकऱ्यांना विमा द्यायला लावा अन्यथा एकेकालेला कपडे काढून ठोकेन.. असा गंभीर इशारा दिला. यावेळी तुपकरांच्या आक्रमक भूमिकेमुळे तहसील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.