वादळी वाऱ्यासह विजेचा कहर! सावखेड तेजनमध्ये विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याची तीन जनावरे ठार – आर्थिक नुकसानाने कुटुंब उघड्यावर...
May 6, 2025, 08:19 IST
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) –
सावखेड तेजन गावात शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने हाहाकार माजवला. यावेळी विजेच्या धक्क्याने शेतकरी बाजीराव ताऊबा आंधळे यांच्या तिन्ही जनावरांचा मृत्यू झाला असून, उर्वरित दोन जनावरे किरकोळ जखमी झाली आहेत. या घटनेने शेतकरी कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे.
वादळी वारा, पाऊस आणि विजांचा कडकडाट
दुपारी साधारण ४ वाजताच्या सुमारास वातावरणात अचानक बदल होऊन गावात जोरदार वारे वाहू लागले. त्यातच विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी आंधळे यांनी लिंबाच्या झाडाखाली बांधलेली जनावरे वीजेच्या कचाट्यात सापडली.
तीन जनावरांचा जागीच मृत्यू
आंधळे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडावर वीज कोसळल्याने एक दुभती गाय, एक गोहा व एक बैल जागीच ठार झाले. ही जनावरे त्यांच्या शेतीच्या कामासाठी अत्यावश्यक होती. उर्वरित दोन जनावरे किरकोळ जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शेतीचा आधारच गमावला...
या आघातामुळे आंधळे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. सध्या शेतीमालाचे दर घसरलेले असताना, या तिन्ही जनावरांचा मृत्यू म्हणजे शेतकऱ्याच्या जिवंत साधनसंपत्तीचा नाश आहे. "गाय दूध देणारी होती, बैल नांगरणीसाठी उपयोगी होता, आता काय करायचं?" असा सवाल शेतकरी कुटुंब करतोय.
तत्काळ मदतीची मागणी
घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी विष्णू थोरात आणि तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुंढे घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करण्यात आला असून, मृत जनावरांचे शवविच्छेदनही करण्यात आले. "शासनाने त्वरीत आर्थिक मदत द्यावी", अशी मागणी ग्रामस्थ आणि स्थानिक शेतकरी करत आहेत.
सतर्कतेचा इशारा
महसूल अधिकाऱ्यांनी जनतेला आवाहन केलं आहे की, विजेच्या धोक्यापासून वाचण्यासाठी हवामानात बदल जाणवताच जनावरांना उघड्यावर बांधू नये, झाडाखाली ठेवू नये.