बिबट्याचा अचानक हल्ला अन् हातात विळा घेऊन महिलेचा प्रतिकार; मोताळ्यात सुनीता कुसळकर यांच्या धाडसाची चर्चा!

 
 मोताळा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : सोयाबीनची सोंगणी करत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला... समोर मृत्यूचे संकट उभे ठाकले, मात्र घाबरून न जाता महिलेने हातातील विळ्याने बिबट्याचा प्रतिकार केला! मोताळा तालुक्यातील थळ शिवारात मंगळवारी, २९ सप्टेंबर रोजी दुपारी घडलेल्या या थरारक घटनेत सुनीता प्रकाश कुसळकर (रा. थळ) या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता कुसळकर या थळ गावशिवारातील गट क्रमांक ४३ मधील शेतात एकट्याच सोयाबीनची सोंगणी करत होत्या. दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली. हल्ल्यात त्या जखमी झाल्या; मात्र संकटाच्या क्षणी त्यांनी धीर सोडला नाही. हातातील विळ्याने त्यांनी बिबट्याचा प्रतिकार करण्यास सुरुवात केली.

बिबट्याशी झुंज देताना सुनीता कुसळकर यांनी दाखवलेले हे धाडस परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे. जिवावर बेतलेल्या प्रसंगातही प्रसंगावधान राखून प्रतिकार करण्याची त्यांची हिंमत निश्चितच कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, शेतालगतच्या बांधावर बकऱ्या चारत असलेल्या काही युवकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जोरदार आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. त्यानंतर उपस्थितांनी जखमी सुनीता कुसळकर यांना तातडीने बुलढाणा येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे थळ परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शेतांमध्ये एकट्याने काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जखमी सुनीता कुसळकर यांच्यावर सध्या उपचार सुरू असून, त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. तसेच परिसरात बिबट्याचा वावर लक्षात घेता वनविभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना करून शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून होत आहे.बिबट्याच्या हल्ल्यासमोर न घाबरता विळ्याच्या साहाय्याने प्रतिकार करणाऱ्या सुनीता कुसळकर यांच्या धाडसाचे थळ परिसरातून विशेष कौतुक होत आहे.