पिलांसह बिबट्याचा शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला! प्रसंगावधानामुळे थोडक्यात बचावले; वाघापूर-गोद्री परिसरात दहशत! शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर बिबट्याची झेप;

 आठवडाभरापासून वावर, वनविभागाच्या गस्तीलाच आव्हान...

 
 चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतात काम करताना अचानक समोर बिबट्या आला तर काय होईल? त्यातही बिबट्यासोबत पिल्ले असतील, तर धोका आणखी वाढण्याची भीती असते. असाच थरारक प्रसंग चिखली तालुक्यातील वाघापूर- गोद्री शिवारात घडला. पिलांसह वावरणाऱ्या बिबट्याने शेतकरी दिलीप पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऐनवेळी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ते थोडक्यात बचावले. या घटनेने परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

११ ऑक्टोबरच्या सायंकाळी सातच्या सुमारास वाघापूर- गोद्री रस्त्यावरील शेतात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. शेतकरी दिलीप पाटील यांच्यावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाटील यांनी प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. बिबट्याचा वावर आणि हल्ल्याच्या प्रयत्नाची बातमी परिसरात पसरताच शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी आणि शेतमजूर पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शेतात काम करतात. अशा वेळी बिबट्याचा वावर जीवघेणा ठरू शकतो. विशेष म्हणजे, या घटनेपूर्वीही परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती शेतकऱ्यांनी वनविभागाला दिली होती.

पिलांसह बिबट्या; शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

पिलांसह वावरणारा बिबट्या अधिक आक्रमक होऊ शकतो, विशेषतः त्याला आपल्या पिल्लांना धोका जाणवल्यास. त्यामुळे या भागात काम करणाऱ्या महिला मजूर, शेतकरी आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.शेतात जाणे टाळणे अनेकांना शक्य नाही. पीक काढणीची कामे वेळेत पूर्ण करावी लागतात. मात्र, एका बाजूला हातातोंडाशी आलेले पीक आणि दुसऱ्या बाजूला वन्यप्राण्याची भीती, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.

आठवडाभरापासून वावर, तरी पिंजरा कुठे?

परिसरातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बिबट्याचा वावर गेल्या आठवडाभरापासून जाणवत आहे. २ ऑक्टोबरच्या सुमारासही बिबट्या दिसल्याची लेखी माहिती वनविभागाला देण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने रात्री टॉर्चच्या साहाय्याने पाहणी केली आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला.मात्र, शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, परिसरात पिंजरा लावण्यात आलेला नाही, कॅमेरा ट्रॅप बसविण्यात आलेला नाही आणि नियमित गस्तही सुरू झालेली नाही. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आणखी किती घटनांची वाट पाहणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

सोयाबीन काढणीच्या हंगामात जीव मुठीत!

शेतकरी आणि शेतमजूर पहाटे पाचपासून रात्री दहापर्यंत शेतात काम करत असतात. सोयाबीन काढणीच्या काळात शेतात जाणे अपरिहार्य असल्याने बिबट्याच्या भीतीने काम थांबवणेही कठीण झाले आहे. अंधार पडल्यानंतर शेतातून घरी परतताना किंवा सकाळी कामावर जाताना वन्यप्राण्याचा सामना होण्याची भीती कायम आहे.वनविभागाने परिसरातील संभाव्य वावराच्या ठिकाणांची पाहणी करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक पावले उचलावीत. गरजेनुसार कॅमेरा ट्रॅप, पिंजरा आणि नियमित गस्त याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

वनविभागाने आता तरी गांभीर्याने लक्ष द्यावे!

वाघापूर, गोद्री आणि साकेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी केली आहे. वनविभागाने केवळ पाहणी करून न थांबता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी त्यांची अपेक्षा आहे.

दरम्यान, बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाणे, त्याला घेरणे किंवा पिल्लांच्या दिशेने जाणे टाळावे. नागरिकांनी गर्दी न करता सुरक्षित अंतर राखावे आणि वनविभागाला त्वरित माहिती द्यावी. शेतात जाताना शक्यतो एकट्याने जाणे टाळावे आणि अंधारात विशेष खबरदारी घ्यावी.दिलीप पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नातून ते बचावले, ही दिलासादायक बाब; मात्र प्रत्येक वेळी प्रसंगावधान जीव वाचवेलच असे नाही. त्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने या परिसरातील बिबट्याच्या वावराची दखल घेऊन ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना पिकांची काळजी घेताना स्वतःच्या जीवाची भीती बाळगावी लागू नये, एवढीच अपेक्षा!