तांदूळवाडी शिवारात बिबट्याची दहशत! कापूस वेचणाऱ्या महिलांसमोर अचानक दर्शन; आरडाओरड होताच शेतातून ठोकली धूम!

 साखरखेर्डा परिसरात भीतीचे वातावरण; पिंपळगाव सोनारा, तांदूळवाडीसह परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता

 
 साखरखेर्डा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : साखरखेर्डा परिसरातील तांदूळवाडी, पिंपळगाव सोनारा आणि परिसरातील शिवारांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी दुपारी कापूस वेचण्यासाठी शेतात गेलेल्या महिलांना अचानक बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली. महिलांनी आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने शेतातून धूम ठोकत तांदूळवाडी शिवाराच्या दिशेने धाव घेतल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हा कापूस वेचणीचा हंगाम असल्याने सध्या महिला मजुरांची शेतांमध्ये मोठी वर्दळ असते. अशातच कापसाच्या पिकात बिबट्या लपून बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसह मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आधी नीलगायीची शिकार, आता मानवी वस्तीजवळ वावर!

साखरखेर्डा, पिंपळगाव सोनारा आणि तांदूळवाडी परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा वावर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी मारोती साखरे यांच्या शेतात बिबट्या आढळला होता. त्याने नीलगायीची शिकार केल्याची माहितीही समोर आली होती. मोहाडी, शिंदी, राताळी आणि सवडद परिसरातही बिबट्या वारंवार दिसत असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत.

 महिलांच्या आरडाओरडीने बिबट्याने घेतली धूम!

सोमवारी दुपारी कृष्णा काकडे हे पत्नी आणि इतर महिलांसह शेतात कापूस वेचण्यासाठी गेले होते. कापूस वेचणी सुरू असतानाच अचानक समोर बिबट्या दिसल्याने महिलांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. त्यांनी आरडाओरड करत परिसरातील शेतकऱ्यांना सावध केले. महिला आणि पुरुषांच्या आवाजामुळे बिबट्या तांदूळवाडी शिवाराच्या दिशेने निघून गेल्याचे कृष्णा काकडे यांनी सांगितले.

शेतात जाताना सावधानता बाळगा!

कापसाच्या शेतात बिबट्या लपून बसण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आणि मजुरांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. शेतात एकट्याने जाणे टाळावे, समूहाने काम करावे आणि काम करताना सतर्क राहावे, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे परिसरातील रोही आणि हरणांसारखे वन्यप्राणीही या भागातून दूर गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे वनविभागाने या परिसरात लक्ष घालून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे आता कापूस वेचणीसाठी शेतात जाणाऱ्या महिला मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वनविभागाने तातडीने दखल घेण्याची गरज व्यक्त होत आहे.