सावळा शिवारात बिबट्याचा धुमाकूळ! पंधरा दिवसात तीन जनावरांना केले फस्त.. 

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)
बुलडाणा शहरापासून जवळच असलेल्या सावळा सुंदरखेड परिसरात एका बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्या शेतकऱ्यांचे जनावरे फस्त करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. सावळा शिवारात मागील आठ ते दहा दिवसापासून पाण्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने या शिवारातील अनेक शेतकऱ्यांची जनावरे फस्त केली दरम्यान, २८ मार्च रोजी रात्री बिबट्याने सावळा परिसरातील सुभाष जगताप याशेतकऱ्याच्या गोठ्यात शिरून दोन गाय वासरे ठार केली.
                       (.   जाहिरात 👆.  )
पंधरा दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर जगताप यांच्या गाईचे वासरू ठार केले होते. याबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. या घटनेमुळे सावळा गाव परिसरात बिबट्याची दहशत पसरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे वनविभागाने लक्ष देवून सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. परिसरात दिवसेंदिवस उष्णतेत वाढ होत असून जंगलपरिसरात पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. परिणामी, पाण्याच्या शोधात वन्यप्राणी शहराकडे धाव घेत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.