स्व. सोमनाथ सावळेंच्या आठवणींनी पत्रकार भवन गहिवरले; पुण्यतिथीनिमित्त माजी मंत्री डॉ. शिंगणेंच्याहस्ते सत्यनिष्ठ पत्रकारितेचा गौरव!
नितीन शिरसाटांना जीवन गौरव, रणजीत राजपूत उत्कृष्ट तर अभिषेक वरपे यांना युवा पत्रकारिता पुरस्कार प्रदान
बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी बुलढाणा येथील पत्रकार भवनातील सभागृहात झालेल्या पुण्यतिथी अभिवादन आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याला माजी मंत्री तथा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे, सीईओ डॉ. अशोक खरात, मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, महिला पत्रकार सुरेखाताई सावळे व्यासपीठावर उपस्थित होते. तर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, सेवानिवृत्त अभियंता बी. टी. जाधव यांनीही आवर्जून उपस्थिती लावली. सर्वप्रथम दीपप्रज्वलन आणि स्वर्गीय सोमनाथ सावळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रास्ताविकातून बुलढाणा जिल्हा पत्रकार महिला सेलच्या अध्यक्षा ॲड. मृणाल सावळे यांनी सोमनाथ सावळे यांच्या पत्रकारितेचा गौरव म्हणून, यावर्षीपासून पुरस्कार सोहळ्याचे आयोजन होत असल्याचे स्पष्ट केले. वडिलांच्या आठवणी मांडत असताना, त्यांचा पत्रकाराविषयी असलेला कळवळा, मिळालेले पुरस्कार, नव्या विषयांचे संशोधन असा एकूण प्रवास सांगितला. यानंतर, नितीन शिरसाट यांना जीवन गौरव, रणजीत राजपूत यांना उत्कृष्ट तर अभिषेक वरपे यांना युवा पत्रकारिता पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराच्या मानकरी पत्रकारांनी मनोगत व्यक्त केले. सामाजिक वेदनांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करणार असून, पुरस्काराने नवी ऊर्जा मिळाली असे अभिषेक वरपे म्हणाले. नितीन शिरसाटांनी सोमनाथ सावळे यांच्या सोबत घालवलेले प्रसंग आणि अनेक किस्से सांगत आठवणी मांडल्या. येणारा काळ पत्रकारांसाठी आव्हानात्मक असल्याचे सांगत पत्रकारांनी संघटीत होण्याची गरज आहे, असे आवाहन रणजीतसिंग राजपूत यांनी केले. राजपूत यांनी काळानुरूप पत्रकारिता कशी बदलत आहे? हे समजावून सांगितले. डॉ. श्रुती सावळे यांनी वडिलांच्या भूमिकेचे महत्त्व सांगितले, त्यावेळी संपूर्ण पत्रकार भवन भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले. सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार रविकिरण टाकळकर यांनी केले.
माध्यम अनेक, पण वर्तमानपत्राची विश्वासार्हता कायम : डॉ. राजेंद्र शिंगणे
'सध्या माध्यम उदंड झाली आहेत, फेसबुक, इंस्टाग्राम अशा सोशल मीडियातूनही पत्रकारिता केली जात आहे. मात्र, वर्तमानपत्रांनी विश्वासार्हता कायम ठेवली आहे, असे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी भाषणातून सांगितले. स्व. सोमनाथ सावळे यांच्याविषयी बोलताना, निर्भीड पत्रकारिता कशी असते, हे त्यांनी दाखवून दिल्याचे, शिंगणे म्हणाले.