जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात ‘स्वर्गीय बाळासाहेब भवन’ उभारणार! आमदार संजय गायकवाड यांची माहिती! शिवसेनेच्या जिल्हा नियोजन बैठकीत संघटनात्मक बळकटीवर भर...
Jun 9, 2025, 14:39 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘स्वर्गीय बाळासाहेब भवन’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा आमदार संजय गायकवाड यांनी केली.
शिवसेना जिल्हा नियोजन बैठक आज,९ जून रोजी बुलढाणा येथील मातोश्री जनसंपर्क कार्यालयात पार पडली. या बैठकीत आमदार तथा जिल्हा संपर्कप्रमुख धर्मवीर संजय गायकवाड यांनी अध्यक्षस्थान भूषवले. बैठकीत शिवसेनेचे विविध अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान बोलताना आमदार संजुभाऊ गायकवाड म्हणाले, “शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रसार प्रत्येक गावपातळीवर व्हावा, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात ‘बाळासाहेब भवन’ उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या माध्यमातून शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होणार असून कार्यकर्त्यांसाठी एक सक्षम मंच तयार होईल.” शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून आमदार गायकवाड यांची नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्यात संघटनात्मक कामकाजाला वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संघटन मजबूत करण्यावर आ.गायकवाड यांचा भर आहे.
बैठकीस युवासेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य मृत्युंजय गायकवाड, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, किसान सेनेचे संदीप गायकवाड, ज्येष्ठ नेते विजय अंभोरे, महिला आघाडीच्या अनुजाताई सावळे, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख राजेश मुंगळे, शिक्षक सेनेचे सुनील जाधव आदींसह उपजिल्हा प्रमुख व विभाग प्रमुख उपस्थित होते.