सिंदखेडराजात मूलभूत सुविधांचा अभाव, कैलास मेहेत्रे यांचे दंडवत आंदोलन!गणेशोत्सवापूर्वी विकासकामे पूर्ण करा, अन्यथा आंदाेलन करण्याचा इशारा ....

 
 सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मूलभूत सुविधांविषयी राजकीय पक्ष आक्रमक हाेत असल्याचे चित्र आहे. सिंदखेड राजा शहारात मूलभूत नागरी सुविधांच्या अभावावर लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते कैलास मेहेत्रे यांनी शुक्रवारी दंडवत आंदोलन केले. 
 
सध्या सिंदखेडराजा शहरात अंतर्गत जलवाहिनी व भूमिगत गटार योजना राबविण्यात येत आहे. मात्र, या कामांची अंमलबजावणी अत्यंत असमाधानकारक असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. धूळ, खड्डे, वाहतूककोंडी आणि अपुऱ्या सुविधांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासकीय यंत्रणा नागरिकांच्या समस्या सोडवण्याऐवजी दुर्लक्ष करत असल्याची टीका कैलास मेहेत्रे यांनी यावेळी केली. राजवाडा परिसरापासून नटराज चौक, त्रिगुणी पार, माणिक चौक, आढाव गल्ली, सोमवार पेठमार्गे रामेश्वर मंदिरापर्यंत शेकडो दंडवत घालून त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. या आंदोलनाला सतीश आढाव, प्रदीप मेहेत्रे, भुजंग जाधव, लक्ष्मण ढवळे, रामेश्वर मंडळकर, खंडू मेहेत्रे, संदीप जाधव, महेंद्र मस्के, संजय म्हस्के, प्रल्हाद मेहेत्रे यांच्यासह सिंदखेडराजा युवा संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला.